
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. एका दागिन्यांच्या ब्रँडच्या रक्षाबंधन विशेष जाहिरातीत क्रिती आपल्या पाळीव कुत्र्याला राखी बांधताना दिसत आहे. मात्र, या जाहिरातीतील काही दृश्यांवर सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला असून, त्यावरून ऑनलाइन वाद सुरू झाला आहे. या जाहिरातीत रक्षाबंधनाचा सण आधुनिक पद्धतीने साजरा करताना दाखवण्यात आला आहे.
या जाहिरातीमध्ये क्रितीने घातलेल्या कपड्यांवरून ती सध्या सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागली आहे. क्रिती सेननने ऑफ-व्हाइट रंगाचा ब्रॅलेट-स्टाइल ब्लाउज, केप आणि ड्रेप्ड स्कर्ट परिधान केला आहे. तिच्या या लूकवरही काही युजर्सनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रक्षाबंधनासारख्या पारंपरिक सणासाठी हा पोशाख योग्य आहे का, असा सवाल काहींनी केला आहे.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार जाहिरातीतील आणखी एका दृश्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. क्रितीआपल्या पाळीव कुत्र्याला राखी बांधताना दिसते. जाहिरातीत त्या कुत्र्याला कुटुंबाचा सदस्य म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यामुळे काहींनी या संकल्पनेचे समर्थन केले आहे. पाळीव प्राणी कुटुंबाचा भाग असतात, त्यामुळे त्यांच्यासोबत सण साजरा करण्यात गैर काय, असा सवाल काही युजर्सनी केला.
मात्र, दुसरीकडे काही सोशल मीडिया युजर्सनी या जाहिरातीवर जोरदार टीका केली. त्यांच्या मते, पारंपरिक सणाला अशा प्रकारे सादर करून त्याचे गांभीर्य कमी करण्यात आले आहे. काहींनी जाहिरातीच्या संकल्पनेला भारतीय सणांची खिल्ली उडवणारे असल्याचे म्हटले. या जाहिरातीवरून सोशल मीडियावर दोन वेगवेगळे गट दिसून येत आहेत. काही युजर्सनी ब्रँडच्या आधुनिक आणि वेगळ्या क्रिएटिव्ह संकल्पनेचे कौतुक केले आहे, तर काहींनी सणाच्या पारंपरिक स्वरूपाशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.
एका युजरने क्रितीच्या कपड्यांवर प्रश्न उपस्थित करत, “रक्षाबंधनाऐवजी ईद किंवा ख्रिसमसच्या जाहिरातीतही असेच कपडे दाखवले असते का?” असा सवाल केला. त्यामुळे क्रिती सेननच्या या जाहिरातीवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.


























































