यशच्या ‘टॉक्सिक’साठी प्रेक्षक वेडे झाले; प्रदर्शनापूर्वीच कमावले इतके कोटी, मुंबईत शो वाढवण्यात आले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कन्नड सुपरस्टार यशच्या टाॅक्सिक चित्रपटाची फॅन्स खूप आतुरतने वाट पाहात आहेत. यशचा बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक : अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून, 21 ऑगस्ट रोजी हिंदुस्थानमध्ये सुरू झालेल्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून मुंबईत शो वाढवण्यात आले आहेत.

ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कच्या अहवालानुसार, पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘टॉक्सिक’ने तब्बल 15 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. यातील हिंदी आवृत्तीनेच प्री-सेलच्या माध्यमातून सुमारे 8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ब्लॉक केलेल्या सीट्ससह चित्रपट निर्मिती संघाने प्री-बुकिंगमधून 32.52 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला असून, देशभरात 6 लाखांपेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली आहे. प्रदर्शनाला दोन दिवस बाकी असताना वाढत्या शोजमुळे या कमाईत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. यशच्या होम स्टेट असलेल्या कर्नाटकमध्ये तिकिट बुकिंगने धुमाकूळ घातला असून, तेथील कमाई 15 कोटींच्या पुढे गेली आहे. दुसरीकडे हिंदी पट्ट्यातही प्री-सेल्सने 11 कोटींचा आकडा गाठला आहे. प्रेक्षकांच्या या अलोट प्रतिसादामुळे चित्रपटगृहांना विशेष शोज आयोजित करावे लागत आहेत. मुंबईत तर पहाटे 6 वाजल्यापासून ते मध्यरात्री 11:45 आणि 11:59 पर्यंत सलग शोज चालवले जात आहेत. मागणी प्रचंड असल्याने काही प्रीमियम थिएटर्समध्ये तिकिटांचे दर वाढवण्यात आले असून, मुंबई व बंगळूरुमधील काही ठिकाणी सर्वाधिक महागड्या तिकिटांचा दर 2,250 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

दरम्यान, शनिवारी आयोजित प्री-रिलीज कार्यक्रमात यशने ट्रेलरमधील स्त्री पात्रांवर झालेल्या टीकेला उत्तर दिले. तो म्हणाला की, त्याला त्याच्या कामामुळे आदर मिळतो आणि या चित्रपटातील प्रत्येक स्त्री पात्र अत्यंत कणखरपणे मांडण्यात आले आहे. ट्रेलरवरून गैरसमज न करून घेता, या चित्रपटात महिलांचा आवाज प्रभावीपणे पोहोचवण्यात आला असल्याचे सांगत त्याने महिला प्रेक्षकांना थिएटर्समध्ये येऊन चित्रपटाचा आनंद घेण्याचे आवाहन केले. या चित्रपटात यश ‘राया’ आणि ‘तिकीट’ अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत कियारा अडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत अशी तगडी स्टारकास्ट आहे. ‘टॉक्सिक’ हा चित्रपट जगभरात तब्बल 12 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.