गरोदर असल्याचे समजताच 14 वर्षीय मुलीने तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी, सुदैवाने वाचवण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो सौजन्य-http://joy105.com

अपहरण करून लैंगिक अत्याचार झालेल्या 14 वर्षीय मुलीने आपण गरोदर असल्याचे समजल्यानंतर फरिदाबाद जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली. मात्र, न्यायालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेतल्यानंतर ती खाली असलेल्या पत्र्याच्या शेडवर पडली. त्यामुळे तिला मोठी दुखापत झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

या तरुणीला शुक्रवारी फरिदाबादमधून पोलिसांनी शोधून काढले होते. त्यानंतर शनिवारी तिचा जबाब नोंदवण्यासाठी आणि दंडाधिकाऱ्यांसमोर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिला जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. सुनावणीदरम्यान तपासाचा भाग म्हणून करण्यात आलेल्या तिच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला. या अहवालातून ती गरोदर असल्याचे समोर आले.

गरोदर असल्याचे समजल्यानंतर तरुणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली. तिने सोबत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला मळमळ होत असून स्वच्छतागृहात जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर ती न्यायालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहातील खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुलगी खाली असलेल्या पत्र्याच्या शेडवर पडली. त्यामुळे तिला मोठी दुखापत झाली नाही. घटनेनंतर पोलिसांनी तिला तातडीने खाली आणले आणि पोलिस ठाण्यात नेले. सध्या तिच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आरोपींविरोधात पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तिच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली. शुक्रवारी पोलिसांनी तिला फरिदाबादमधून शोधून काढले. तपासादरम्यान तरुणीला तिच्याच परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने पळवून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.