
कौटुंबिक वादातून पतीने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली. कसबा पेठे परिसरात सोमवारी ही घटना घडली. या घटनेत पतीच्या हाताला गोळी लागली असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस सखोल तपास करत आहेत.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराजवळ पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाला. दोघांनीही एकमेकांना गोळी मारण्याबाबत बोलल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याचदरम्यान गोळीबार झाला आणि पतीच्या उजव्या हाताला गोळी लागली. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, असे एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून शस्त्रास्त्रासह इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. या जोडप्यामध्ये नक्की कोणत्या कारणातून वाद झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. गोळीबार नेमका कसा झाला? याबाबत फरासखाना पोलीस तपास करत आहेत. पत्नीच्या चौकशीनंतरच घटनेचा अधिक तपशील प्राप्त होण्याची शक्यता आहे.


























































