
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. देशातील वाढती बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवरून त्यांनी केंद्र सरकारला थेट सवाल केले आहेत. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती शेअर करत, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे तरुण पिढीचे शिक्षण आणि रोजगाराचे भवितव्य पूर्णपणे धोक्यात आल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी NEET-UG आणि NEET-PG सारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि पदवी प्राप्त केलेल्या तरुणांमधील वाढत्या बेरोजगारीचा मुद्दा ठळकपणे मांडला. देशातील लाखो तरुण आणि त्यांची कुटुंबे आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून तसेच शैक्षणिक कर्जे काढून पदव्या मिळवतात. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नाहीत, असे खरगे यांनी नमूद केले. पिरिओडिक लेबर फोर्स सर्वे (PLFS) चा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, 20 ते 29 या वयोगटातील एकूण बेरोजगारांमध्ये तब्बल 67 टक्के प्रमाण हे पदवीधरांचे आहे, तर 15 ते 25 वयोगटातील पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर जवळपास 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरवर्षी 2 कोटी नवीन नोकऱ्या देण्याच्या वचनाची आठवण करून देत खरगे यांनी सरकारला जाब विचारला आहे. 12 वर्षांच्या काळात 24 कोटी रोजगाराच्या संधी निर्माण होणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात लाखो सरकारी पदनिर्मिती थांबली असून ती पदे रिक्त पडून आहेत. तसेच सुरक्षित आणि कायमस्वरूपी नोकऱ्यांऐवजी कंत्राटी व पार्ट-टाईम कामांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचा आरोप त्यांनी केला.
Modi Govt has completely ravaged young India’s entire pathway from Education to Employment.
NITI Aayog estimates that 8.7 crore young Indians aged 15 to 29 are neither in education, employment nor training. Nearly 88% are engaged in domestic duties.
At the same time, youth… pic.twitter.com/JP7zxNL4E0
— Mallikarjun Kharge (@kharge) August 24, 2026
देशाच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचे लोकसंख्याशास्त्रीय आपत्तीत रूपांतर नक्की कोण करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महागडे व अपुरे शिक्षण, प्रश्नपत्रिका फुटीची मालिका, नोकरभरतीतील विलंब, वाढती कौशल्य दरी आणि गायब होत चाललेले दर्जेदार रोजगार या सर्व घटकांमुळे एका संपूर्ण पिढीचे भविष्य टांगणीला लागले असल्याचे खरगे म्हणाले. मागील सरकारांना 70 वर्षांत जे जमले नाही ते साध्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते, त्याचा खरगे यांनी उपरोधिकपणे पुनरुच्चार केला. खर्चात प्रचंड वाढ झालेली शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षांवरील तरुणांचा उडालेला विश्वास आणि नोकऱ्यांशिवाय मिळणाऱ्या पदव्या हीच भाजप सरकारची खरी कामगिरी असल्याचा टोला खरगे यांनी लगावला.




























































