जनगणना ही NRC लागू करण्याची छुपी वाट; ममता बॅनर्जींचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार निशाणा साधला आहे. जनगणना प्रक्रियेचा वापर राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्यासाठी केला जाऊ शकतो, असा आरोप त्यांनी केला. तसेच भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणावर टीका करताना हिंदू धर्म आणि भाजपचे ‘हिंदुत्व’ यांच्यात फरक असल्याचे त्यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधला. जनगणनेच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. जनगणना प्रक्रिया ही NRC लागू करण्यासाठीची आणखी एक चोरवाट असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच राजकीय पक्षांशी पुरेसा सल्लामसलत न करता ही प्रक्रिया राबवली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर लाखो पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून बेकायदेशीररीत्या वगळली गेल्याचा दावा त्यांनी केला. गरज भासल्यास पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी महिलांसाठीच्या योजनांसह राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. महिलांच्या आर्थिक योजनांबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील महिलांना दिलेली आश्वासने भाजपने पूर्ण केलेली नाहीत. ‘लक्ष्मी भांडार’ योजनेचा लाभ मोठ्या संख्येने महिलांना मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. आर्थिक लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांची माहिती गोळा करण्यासाठी भविष्यात स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे संकेतही त्यांनी दिले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही टीका केली. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा संदर्भ दिला. हिंदू धर्म हा व्यापक आणि महान विचार असल्याचे त्यांनी म्हटले. राजकीय संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत त्या म्हणाल्या की, भाजपला सत्तेपासून दूर करेपर्यंत आपण थांबणार नाही. आपल्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला.