आधी कायद्याचं राज्य होत, २०१४ नंतर सत्ताधाऱ्यांचे राज्य आलेय, पालकमंत्री आपल्या पसंतीचे पोलीस अधिकारी नेमतो आणि यंत्रणेलाच कीड लागते – असीम सरोदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्वी कायद्याचं राज्य होतं. २०१४ नंतर मात्र सत्ताधाऱ्यांचं राज्य आले आहे.पालकमंत्री आपल्या पसंतीचे पोलीस अधिकारी नेमतो आणि मग संपूर्ण यंत्रणेलाच कीड लागते.मग तटस्थपणे न्याय मिळण्याची अपेक्षा कशी पूर्ण होणार? असा सवाल संविधान विश्लेषक ॲड.असीम सरोदे यांनी उपस्थित केला. ते रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या न्यायवेध सभेत बोलत होते.अन्यायाची सुरूवात ही पोलीस ठाण्यातूनच होते म्हणून ज्यांच्यांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नाहीत अशा लोकांनी समूह करून पोलीस ठाण्यांना भेटी देत जा म्हणजे पोलीस ठाण्याचा कारभार सुधारेल अशी आशा ॲड. सरोदे यांनी व्यक्त केली.

लॉ लॅब इनोव्हेशनच्या वतीने रत्नागिरीत न्यायवेध सभा आयोजित करण्यात आली होती. यासभेत संविधान विश्लेषक ॲड.असीम सरोदे यांनी सडेतोड विचार मांडताना आजच्या न्यायव्यवस्थेचा आणि पोलीस यंत्रणेचा बुरखा फाडला. ॲड. असीम सरोदे यावेळी म्हणाले की, न्यायाधीशांनी तटस्थ राहून काम केले पाहिजे पण आजकाल तसे दिसत नाही.काही चांगले न्यायाधीश आहेत तसे काही चांगले पोलीस अधिकारी आहेत असे स्पष्ट मत मांडताना ॲड.सरोदे यांनी अन्याय झालेला काही मंडळींचे अनुभव यावेळी सांगितले.

पुढे ॲड. असीम सरोदे म्हणाले की, न्याय आता असमतोल झाला आहे.गरीबाला वेगळा न्याय आणि श्रीलंकाला वेगळा न्याय दिला जात आहे.अलिकडे न्याय विकत मिळतो अशी भावना लोकांमध्ये होऊ लागली आहे. श्रीमंत माणसाला मिळणारी वागणूक व गरिब माणसाला मिळणारी वागणूक यामध्ये खूप फरक आहे अशी खंत त्यांनी व्यक्त करताना पिडिताना गरजेनुसार नुकसान भरपाई दिली पाहिजे असे ठाम मत त्यांनी मांडले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर, ॲड. स्वप्निल खोपकर, ॲड. रोहन पाटील उपस्थित होते.

कोकणात पर्यावरण पिडित

कोकणात पर्यावरणवरचं अन्याय झाला आहे. पर्यावरण हेच पिडित आहे.जगाने नाकारलेले प्रकल्प कोकणात आणले जात आहेत.प्रदुषण महामंडळाचे अध्यक्षही इथल्याच एका मंत्र्याचे बंधू आहेत. त्यांना तुम्ही जाऊन विचारले पाहिजे.कोकणाची राखरांगोळी करणारे प्रकल्प आणले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

राजकीय गुन्हेगारी वाढली

शिवसेना पक्ष फोडला,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडला पाठोपाठ आप आणि तृणमूल कॉंग्रेस पक्ष फोडला. पक्ष फोडण्याची पध्दत सगळीकडे सारखीच असून राजकीय गुन्हेगारी वाढली आहे.तुम्ही सर्वांनी एक काम करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पक्षांतर बंदी कायदा रद्द करा अशी मागणी करा म्हणजे या भानगडीच रहाणार नाही असा मार्मिक सल्ला ॲड.सरोदे यांनी दिला.

झेन झीचा उद्या तुमच्यावर मोर्चा येईल

आंदोलनात संविधानिकच भाषा वापरली पाहिजे.पण झेन झी ने हि भाषा वापरली त्या तरूणांना इतका राग आणि संताप का आला याचा विचार करा? आज राजकारण्यांची भाषा बदलली आहे.तुमच्याकडचे एक मंत्री, तिकडे सिंधुदुर्गचे एक मंत्री, दुसरे अहिल्यानगरचे आणि सांगलीतून निवडून आलेले एक आमदार यांची भाषा काय असते ती पहा? एक दिवस हे तरूण तुमच्या भाषेविरूद्ध रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मोर्चा काढतील असा इशारा ॲड सरोदे यांनी दिला. राहूल गांधी यांनी आंदोलक तरूणांवर पॅलेट गन वापरण्याचा आदेश कुणी दिला हे विचारल्यानंतर एक महाशय २२ दिवस अधिवेशनात आलेच नाहीत अशी टीका ॲड.सरोदे यांनी केली.

उदय सामंत हे राजकीय प्रॉडक्ट

उदय सामंत यांनी दोन-तीन पक्ष बदलले आहेत.पहिल्या पक्षात असताना त्यांची भूमिका वेगळी होती. नंतर दुसऱ्या पक्षात गेले तेव्हा ते थोडे चांगले वाटले होते पण पुन्हा सत्तेसाठी एकत्र आलेल्या गटात गेल्यावर त्यांची भूमिका बदलली. म्हणजे उदय सामंत हे राजकीय प्रॉडक्ट आहेत ते स्वताच्या फायद्यासाठी भूमिका बदलतात अशी टीका ॲड. असीम सरोदे यांनी केली.

प्रश्न विचारतच रहाणार

आज प्रश्न विचारले की धमक्या दिल्या जातात. व्यवस्था सुधारण्यासाठी प्रश्न विचारताना ते सत्तेत बसलेल्या व्यक्तीलाच विचारले जाणार आहेत. त्यामुळे जीवावर बेतलं तरी प्रश्न विचारणं आपण सोडणार नाही असे सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी ठणकावून सांगितले.