
ठाणे रेल्वे स्टेशन मोबाईल चोरांची पंढरी बनली आहे. एकाच दिवशी तब्बल १० मोबाईल चोरांनी लंपास केले असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. लोकलमध्ये चढताना-उतरताना तसेच फलाटावर गर्दीत असताना प्रवाशांच्या खिशातून आणि बॅगेतून चोरट्यांनी मोबाईल लांबवले आहेत. या सर्व मोबाईलची एकूण किंमत ४ लाख १० हजार रुपये असून त्यात चार आयफोनचा समावेश आहे.
ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये भामट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागात कार्यरत असलेल्या खुतूब शेख यांचा ठाणे स्थानकात लोकलमध्ये चढताना ३७ हजार रुपये किमती मोबाईल चोरीला गेला. अंधेरीतील कंपनीत नोकरी करणारे अक्षय जांभळे यांचा दिवा स्थानकामध्ये ४० हजारांचा मोबाईल गायब झाला. तसेच मोहम्मद शेख यांचा मुंब्रा स्थानकामधून ३८ हजारांचा मोबाईल चोरीला गेला. वकील असलेल्या मीनाक्षी मोरे या ठाकुर्लीहून ठाण्याकडे येताना त्यांचा ६८ हजार रुपयांचा मोबाईल चोरीला गेला. अमोल सावंत यांचादेखील मोबाईल लंपास झाला आहे.
तपास सुरू
राहुल कोरपे, जय मोरे, सोहन यादगिरी, सुरक्षारक्षक असलेले मंगेश चांदेकर यांचे ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ येथून मोबाईल चोरीला गेले. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लंपास केल्याच्या तक्रारी रेल्वे पोलिसांत दाखल झाल्या असून याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.




























































