कोणत्या जुन्या इमारतीच्या देखभालीसाठी निविदा? शिवसेना नगरसेवक अमित विलणकर यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या इमारतीच्या देखभालीसाठी निविदा काढण्याच्या विषयावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक अमित विलणकर यांनी आज रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत आवाज उठवला. त्यानंतर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी त्यावर स्पष्टीकरण देत हा विषय रद्द करण्यात आल्याचे सांगितले. अशा प्रकारचे चुकीचे विषय करू नका अशी सूचना नगरसेवक अमित विलणकर यांनी मांडली.

काही दिवसांपूर्वीच कंत्राटी सफाई कामगार काशीनाथ गोताड यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. या घटनेवरून नगरसेवकांनी ठेकेदाराने सफाई कर्मचाऱ्यांना गमबूट व ग्लोव्हज दिले पाहिजेत. हे कर्मचारी त्याचा वापर करत आहेत की नाहीत याची पहाणी करावी अशी मागणी केली. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी सफाई कामगार जर साधनसामुग्री वापरत नसतील तर त्यांची रजा मांडावी अशा कडक सूचना दिल्या आहेत.

बांधकाम व्यावसायिकंची वाळू रस्त्यावर टाकली जाते ती उचलणे नगरपरिषदेचे काम नाही मात्र अशा बांधकाम व्यावसायिकांना नगरपरिषद नोटीस काढेल असे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले. रत्नागिरी शहरात सध्या मलेरिया आणि डेंग्यू आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यापार्श्वभूमीवर डॉ.सचिन लांडे यांनी सभागृहात मार्गदर्शन केले.