
नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या एका 35 वर्षीय नराधमाने चॉकलेटचे आमिष दाखवून दोन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कातदायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
ही घटना सोमवारी घडली असून विलास वाघमारे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवारी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विलास पंडित वाघमारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ६४(२)(एफ), ६५(२) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो – POCSO), २०१२ च्या कलम ४, ५(म), ५(न) आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रशांत शिंदे सोनखेड पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. आरोपी विलास ही घटना घडवून पालम जिल्हा परभणी पर्यंत गेल्याचा माग पोलिसांनी काढला आहे. पण अद्याप तो पोलिसांना सापडला नाही. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या या अमानुष अत्याचाराने जिल्हा हादरला असून, नराधम विलास वाघमारे याला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.



























































