
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी कृष्णानगर न्यायालयाने त्यांच्याविरोधात जारी केलेल्या अटक वॉरंटला कलकत्ता उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २७ ऑगस्ट रोजी होणार आहे.
PTI च्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती देबांशू बसाक आणि न्यायमूर्ती आर्यक दत्त यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कृष्णानगर येथील तृतीय न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही महुआ मोईत्रा न्यायालयात हजर न राहिल्याने, १९ ऑगस्ट रोजी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. तसेच २८ ऑगस्टपर्यंत या वॉरंटच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दंडाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र आता उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे.























































