एसटी कर्मचाऱ्यांची घरभाडे आणि महागाई भत्त्याची थकबाकी रखडली, संयुक्त कृती समिती आक्रमक; आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता आणि महागाई भत्त्याची 2018 पासूनची थकबाकी अद्याप प्रलंबित आहे. तसेच वार्षिक वेतनवाढीच्या वाढीव दराची थकबाकी व इतर प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावेत आणि एसटी महामंडळाचे खासगीकरण करू नये, अशा प्रमुख मागण्या करीत एसटी कामगारांच्या विविध संघटनांच्या महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न वेळीच न सोडवल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.

प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधत कृती समितीने एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांना पत्र लिहिले आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 58 टक्के महागाई भत्ता, 10, 20, 30 टक्के घरभाडे भत्ता आणि 3 टक्के वार्षिक वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला तरी अंमलबजावणी झाली नसल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर आणि महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.