
भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे’ अशी श्रद्धा बाळगणाऱ्या आणि तो वारसा समृद्ध करण्यासाठी जीवन समर्पित करणाऱया मराठी भाषा व व्याकरणतज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. शमा भागवत आणि प्रा. रुमा बावीकर या दोन कन्या आहेत. यास्मिन शेख यांच्या निधनामुळे मराठी भाषेची व्रतस्थ वृत्तीने सेवा करणारी भाषायोगिनी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्या प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यातच आज त्यांचे निधन झाले. पुण्यातील एका वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाणेर येथील स्मशानभूमीत दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्यांच्या दोन्ही कन्या, नातेवाईक उपस्थित होते.
यास्मिन शेख यांचे मराठी भाषेवर निस्सिम प्रेम होते. या प्रेमातूनच मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी त्या सतत कार्यरत होत्या. त्यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये 34 वर्षे अध्यापन केले. मुंबईच्या शीव येथील एस.आय.ई.एस. महाविद्यालयात सहा वर्षे त्या मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमा भागवत आणि प्रा. रुमा बावीकर या त्यांच्या दोन्ही मुलींचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले. शासनाच्या ‘स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर’मध्ये आयएएसच्या विद्यार्थ्यांना दहा वर्षे व्याकरण व भाषाशास्त्राचे धडे दिले. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक मराठी व्याकरणाविषयीचं एक अधिकृत पुस्तक मानलं जातं. 2007 मध्ये त्यांनी ‘मराठी शब्दलेखनकोश’ तयार केला. मराठी शब्दांचं योग्य रूप कोणतं, याची माहिती देणारा हा कोश मराठी भाषेचे अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, साहित्यिक आणि मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘कार्यात्मक व्याकरणा’च्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ‘अंतर्नाद’ मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. राज्य शासनाचा डॉ. अशोक केळकर सन्मान त्यांना मिळाला होता. प्रा. श्री. म. माटे यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी श्री. पु. भागवत, विंदा करंदीकर आणि साहित्यिक-नाटककार वसंत कानेटकर यांच्यासोबतही काम केले होते.
‘भाषेला धर्म नसतो’
निवृत्तीनंतर यास्मिन शेख या औंध इथे स्थायिक झाल्या होत्या. एकदा महापालिकेचा एक कर्मचारी जनगणना करण्यासाठी त्यांच्या घरी आला. तो विचारत असलेल्या प्रश्नांमध्ये ‘तुमची मातृभाषा कोणती?’ हा एक प्रश्न होता. ‘मराठी’ हे शेखबाईंनी दिलेले उत्तर त्याला पटत नव्हते. ‘तुमचे आडनाव शेख म्हटल्यावर मातृभाषा उर्दू लिहायला हवी’, असा त्याचा आग्रह होता. पण शेखबाईंनी ‘मातृभाषा मराठी’ अशीच नोंद त्याला करायला लावली. भाषेला धर्म नसतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.




























































