
न्यूयॉर्क शहरात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आगामी कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्या भूमिकेचे तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी समर्थन केले आहे. न्यूयॉर्क हे बहुधार्मिक शहर असून येथे संघाची विचारधारा चालणार नाही, असे सौगत रॉय यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आगामी कार्यक्रमाला ममदानी यांनी आपण समर्थन देत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, खासगीरित्या आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार महापालिका प्रशासनाला आहे की नाही, याबाबत आपण निश्चित नसल्याचे त्यांनी सांगितले.
ममदानी यांच्या या भूमिकेबाबत विचारले असता सौगत रॉय म्हणाले, “न्यूयॉर्क हे बहुधार्मिक शहर आहे. तिथे संघाची विचारधारा चालणार नाही आणि त्यामुळेच कदाचित त्याला विरोध केला जात असावा.”
दरम्यान, पत्रकार परिषदेत ममदानी यांनी आपल्या हिंदुस्थानी-अमेरिकन पार्श्वभूमीबाबत आणि हिंदुस्थानद्दलच्या आपल्या समजुतीबाबतही भाष्य केले. “आपल्या शहराच्या इतिहासातील पहिले हिंदुस्थानी-अमेरिकन महापौर म्हणून मी येथे उभा आहे. माझ्या आईच्या कुटुंबातील सर्वजण अजूनही हिंदुस्थानात आहेत,” असे त्यांनी सांगितले.
आपल्या कुटुंबाकडून हिंदुस्थानची जी प्रतिमा आणि विचार आपण आत्मसात केला, तो बहुविधतावादी समाज आणि प्रत्येक व्यक्तीला समान स्थान देणाऱ्या धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाचा होता, असे ममदानी यांनी स्पष्ट केले.


























































