
समाजवादी पक्षाचे (SP) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपकडून ‘नारी वंदना’ची भाषा केली जाते, मात्र हाथरस प्रकरण देशातील जनता विसरणार नाही, असे अखिलेश यादव यांनी बुधवारी लखनौ येथे पत्रकार परिषदेत म्हटले.
यावेळी अखिलेश यादव यांनी महिला आरक्षण विधेयक, २०२३च्या अंमलबजावणीवरून केंद्र सरकारलाही सवाल केला. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे, मग भाजप त्याची अंमलबजावणी का करत नाही? आगामी निवडणुकीतच महिला आरक्षण लागू केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
“महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे; मग भारतीय जनता पक्ष त्याची अंमलबजावणी का करत नाही? पुढील निवडणुकीत ते लागू केले पाहिजे. महिलांसाठी बससेवा सुरू करत असाल, तर हे आरक्षणही लागू करा. तुम्ही ‘नारी वंदन’बद्दल बोलता, मात्र हाथरसची घटना कोणीही विसरणार नाही,” असे अखिलेश यादव म्हणाले.
हाथरस येथील घटनेचा संदर्भ देताना त्यांनी १९ वर्षीय तरुणीवर १४ सप्टेंबर २०२० रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे हल्ला करून तिच्यावर कथित सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा उल्लेख केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा २९ सप्टेंबर २०२० रोजी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
अखिलेश यादव यांनी यावेळी आपल्या पक्षातील महिलांचेही कौतुक केले. “आपल्या पक्षातील महिलांचे मी आभार मानतो. त्या देशाच्या निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात शिक्षण आणि आरोग्याबाबत घेण्यात आलेले निर्णय आजही आदर्श आहेत,” असे त्यांनी सांगितले.


























































