बाप्पाच्या आगमनाने मुंबापुरी दुमदुमली! चिंतामणी, परळचा राजा, मुंबईचा पेशवाचे जल्लोषात आगमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढोल-ताशांचा गजर, जागोजागी फुलांची उधळण, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन लेझीमच्या तालावर थिरकणारी तरुणाई… अशा मोठ्या थाटामाटात शनिवारी चिंचपोकळीचा चिंतामणीसह परळचा राजा, परळचा महाराजा, साकीनाक्याचा महाराजा, मुंबईचा पेशवा अशा मुंबई शहरासह उपनगरातील ५० हून अधिक सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे आगमन झाले. लालबाग-परळमधील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते. मिळेल त्या जागी उभे राहून भाविक बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी आणि ती कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी आतुर झाले होते.

मुंबई शहर आणि उपनगरात १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. भव्यदिव्य गणेशमूर्ती आणि नयनरम्य देखावे हे मुंबईतील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. त्यामुळे सजावटीसाठी काही दिवस अगोदरच मोठ्या मंडळांच्या बाप्पाचे आगमन होते. शनिवारी वीकेंडचा मुहूर्त साधत चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा, साकीनाक्याचा महाराजा, परळचा महाराजा, खेतवाडी १० वी गल्ली येथील बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कोलभाट लेनचा राजा, मुंबईचा पेशवा, परळचा लाडका, मुंबईचा शाहू, कुंभारवाड्याचा मोरया, कुंभारवाड्याचा गणराज, मालवणीचा महाराजा, महाकालीचा महाराजा, मालवणी म्हाडाचा राजा आदी मंडळांच्या बाप्पांचे आगमन झाले. उद्या रविवारीदेखील मोठ्या प्रमाणात बाप्पांचे आगमन सोहळे होणार आहेत.

पोलीस आणि स्वयंसेवकांचा फौजफाटा

बाप्पाचा आगमन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता. याशिवाय मंडळांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकदेखील वाहतुकीचे नियोजन करताना दिसत होते.

साकीनाक्याचा महाराजा ठरतोय आकर्षण

यंदाही मुंबईतील मानाच्या गणेश मंडळांसोबत अनेक सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात सर्वाधिक चर्चा आहे ती ‘साकीनाक्याचा महाराजा’ची. प्रसिद्ध मूर्तिकार पृणाल पाटील यांच्या कारखान्यात ही मूर्ती साकारण्यात आली असून मल्हारी मार्तंड अवतारातील या मूर्तीची उंची तब्बल ४५ ते ४८ फूट इतकी आहे. मुंबई उपनगरातील सर्वात उंच आणि महागडी ही मूर्ती असल्याची चर्चा आहे.