
निवृत्ती वर्षातील सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा देणाऱया कर्मचाऱयांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारावर त्यांची पेन्शन ठरणार आहे. तसा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा प्रकारे निवृत्ती वेतनाची पुनर्रचना करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्या. नितीन सूर्यवंशी व न्या. आबासाहेब शिंदे यांच्या औरंगाबाद खंडपीठाने हे आदेश दिले. फेररचनेनुसार निवृत्ती वेतनावरील थकबाकीची रक्कम या कर्मचाऱयांना 90 दिवसांच्या आत द्यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. या थकबाकीवर व्याज देता येणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण…
पेन्शन लाभासाठी अनिलकुमार दादशेडे व अन्य यांनी याचिका केली होती. या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने हे आदेश दिले. याआधी मुंबई उच्च न्यायालय व कोल्हापूर सर्किट बेंचने अशाच प्रकारचे आदेश दिले आहेत. त्या आधारावर हा निकाल दिला जात आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.


























































