
तेलंगणातील सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटमधील अतिसुरक्षित परिसरातून तब्बल 11 शस्त्रे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीला गेलेल्या शस्त्रांमध्ये चार AK-47 रायफल, सहा पिस्तुले आणि एका INSAS रायफलचा समावेश आहे. या प्रकरणाचा लष्कर आणि पोलिसांकडून संयुक्तपणे तपास सुरू असून, शस्त्र चोरीमागे आतील व्यक्तीचा (इनसाइडर) सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, रविवारी रात्री मद्रास रेजिमेंटच्या परिसरातील एका खोलीत ही चोरी झाल्याचा संशय आहे. हा परिसर अत्यंत सुरक्षित मानला जात असून, येथे प्रामुख्याने लष्करी जवान आणि कंत्राटी युनिटशी संबंधित मोजक्या नागरी कर्मचाऱ्यांनाच प्रवेश असतो.
पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तींनी संबंधित ठिकाणी प्रवेश करून कुलूप तोडले आणि दरवाजा जबरदस्तीने उघडला. त्यानंतर त्यांनी खोलीतील शस्त्रे चोरून नेली. मात्र, एवढ्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतील ठिकाणाहून ही शस्त्रे नेमकी कशी बाहेर काढण्यात आली, याचा तपास अद्याप सुरू आहे.
लष्करी जवानांच्या लक्षात काही अत्याधुनिक शस्त्रे गायब असल्याचे आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी संबंधित परिसर सील केला. सुरक्षेत नेमकी कुठे आणि कशी त्रुटी राहिली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणी लष्करी जवानांच्या तक्रारीवरून सोमवारी बोल्लाराम पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मलकाजगिरी पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारीही तपासात सहभागी झाले आहेत.
तपास पथकाकडून कॅन्टोन्मेंट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, सुरक्षा रक्षक तसेच अलीकडच्या काळात शस्त्र साठवणूक कक्षात प्रवेश असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. लष्कराच्या रेजिमेंटकडून पूर्ण सहकार्य मिळत असून तपास सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
या चोरीमध्ये एखाद्या आतील व्यक्तीचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. संबंधित परिसरात सशस्त्र सुरक्षा कर्मचारी पाळीपाळीने तैनात असतात. मात्र, चोरीच्या वेळी परिसरात मोजकेच सुरक्षा रक्षक उपस्थित असण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या सूत्रांच्या माहितीनुसार, तपासाच्या प्राथमिक टप्प्यात काही आतल्याच व्यक्तींची भूमिका असल्याचे संकेत मिळाले आहेत. या युनिटशी संबंधित विविध व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. शस्त्र साठवणूक कक्षात प्रवेश मिळवून देण्यासाठी कोणाची मदत झाली का, याचाही लष्कराकडून तपास केला जात आहे.
दरम्यान, कडेकोट सुरक्षा असलेल्या कॅन्टोन्मेंटमधून ही शस्त्रे कोणाच्याही लक्षात न येता बाहेर कशी नेण्यात आली, हा तपासातील महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलिसांनी या प्रकरणातील तपासाची माहिती सध्या गोपनीय ठेवली असून, चोरीला गेलेली शस्त्रे शोधण्यासह संबंधित आरोपींचा माग काढण्यासाठी विविध पथके काम करत आहेत.


























































