या गुन्ह्यावरही नेहमीप्रमाणे पडदा टाकला जाईल! धावत्या बसमधील सामूहिक बलात्कारानंतर राहुल गांधींचा केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोएडामध्ये एका धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडील गृहखात्यावर कोणतीही जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता नाही, कारण या गुन्ह्यावरही नेहमीप्रमाणे पडदा टाकला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.

दिल्ली-एनसीआर महिलांसाठी इतके असुरक्षित झाले आहे की ग्रेटर नोएडा ते दिल्ली अशा ४७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान स्लीपर बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. संपूर्ण दिल्ली पोलिसांना किंवा नोएडा पोलिसांना या घटनेची पुसटशीही कल्पना नव्हती, ही अत्यंत आश्चर्यकारक बाब आहे, असे गांधी यांनी ‘एक्स’ वर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे.

‘ही बस नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे, दिल्लीचा रिंग रोड, सीमा – हे सर्व पार करत गेली, पण एकाही चेकपॉईंटवर तिला एकदाही अडवले गेले नाही. बसच्या सीटवर पडदे ओढलेले होते जेणेकरून आत काय चालले आहे ते कोणालाही दिसू नये आणि गुन्हेगारांना तर प्रशासनाची जराही भीती नव्हती’, असे ते म्हणाले.

‘निर्भया’ प्रकरणाला एवढी वर्षे उलटून गेल्यानंतरही आणि अशा अनेक घटना घडल्यानंतरही, अशा प्रकारच्या बसेसची तपासणी आणि देखरेख करण्याच्या नियमांचे पालन अद्याप का केले जात नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला.

‘ते पडदे फक्त त्या एका बसवरच ओढलेले नव्हते – तर प्रशासनाच्या अपयशावर वर्षानुवर्षे सरकारकडून टाकल्या जाणाऱ्या पडद्यांचाच हा परिणाम आहे; ज्यामुळे देशाच्या राजधानीतही महिलांना सुरक्षितपणे प्रवास करणे शक्य राहिलेले नाही’, अशा कडक शब्दात राहुल गांधी यांनी गृहखात्याच्या कारभारावर ताशेरे ओढले.

केंद्र आणि राज्य सरकारे ही व्यवस्था सुधारण्यापूर्वी आणखी किती महिला आणि मुलींना या अत्याचाराला सामोरे जावे लागेल, असा गंभीर प्रश्नही त्यांनी विचारला.

‘अमित शहा यांच्या अखत्यारीतील दिल्ली पोलीस किंवा आदित्यनाथ यांच्या अखत्यारीतील उत्तर प्रदेश पोलिसांची काही जबाबदारी निश्चित होईल का? अजिबात नाही – या गुन्ह्यावरही नेहमीप्रमाणे फक्त पडदा टाकला जाईल’, असे ते म्हणाले.

या महिन्याच्या सुरुवातीला एका रात्री ग्रेटर नोएडामधून स्लीपर बसमध्ये बसलेल्या एका १६ वर्षीय मुलीवर त्या बसच्या कंडक्टर आणि चालकाने कथितरीत्या सामूहिक बलात्कार केला आणि तिला जुन्या दिल्लीतील ४० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या काश्मिरी गेटजवळ सोडून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे सांगत पोलिसांनी स्पष्ट केले की जेव्हा मुलीवर बलात्कार झाला तेव्हा बस धावती होती.

या गुन्ह्याने २०१२ मधील दिल्लीत घडलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या ‘निर्भया’ प्रकरणाच्या वेदनादायी आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत; ही घटना ४ ऑगस्टच्या रात्री घडली.

आईने रागावल्यामुळे दुखावलेली, उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथील ही मुलगी घर सोडून निघाली आणि तिचा चुलत भाऊ राहत असलेल्या नोएडा सेक्टर ६३ कडे जाणाऱ्या बसमध्ये बसली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रात्री ९ च्या सुमारास मुसळधार पावसात ती चुकून ग्रेटर नोएडामधील परी चौक येथे उतरली, असे ११ वीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले.

मुसळधार पावसात उभी असताना त्या मुलीला समजले की ती तिच्या भावाच्या घरापासून अजूनही सुमारे २५ किलोमीटर दूर आहे. तिथे पोहोचण्यासाठी ती वाहनाची वाट पाहत असतानाच, तिच्याजवळ एक बस येऊन थांबली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कंडक्टरने तिला सांगितले की ते सेक्टर ६३ च्या दिशेनेच चालले आहेत आणि तिला तिथे सोडतील. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती मुलगी बसमध्ये चढली. मात्र, ती बस त्या रात्री प्रवासी सेवेतील बस नव्हती.

तपास अधिकारी आणि बस चालवणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती बस ग्रेटर नोएडामधील सूरजपूर येथील एका वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी नेण्यात आली होती.

दोन्ही आरोपींनी संध्याकाळी ५ च्या सुमारास वर्कशॉपमधून ती बस घेतली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी आपला प्रवास सुरू केला.

त्यांनी सूरजपूर ते परी चौक असा प्रवास केला, जिथे त्यांनी त्या मुलीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बसमध्ये बसवले आणि त्यानंतर ते काश्मिरी गेटच्या दिशेने पुढे निघाले. वाटेत त्या दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप तिने आपल्या तक्रारीत केला आहे.

त्या मुलीला काश्मिरी गेटजवळ रस्त्यावर सोडून देण्यात आले, तिथून तिने कशीबशी रिक्षा पकडून पोलीस ठाणे गाठले.

एका व्हिडिओ निवेदनात, पोलीस उपायुक्त (उत्तर) निहारिका भट्ट यांनी सांगितले की, कोणत्याही कार्यक्षेत्राच्या (हद्दीच्या) वादात न पडता, दिल्ली पोलिसांनी थेट एफआयआर नोंदवला आणि आरोपींना अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू केली.