
सहस्रकुंड धबधबा येथील महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या कमांडर जीपला सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. किनवट तालुक्यातील तोटंबा गावाजवळील घाटात ही घडली. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यात हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील कुबेर मंडळातील पारडी येथील रहिवासी असलेले भाविक कमांडर जीपने सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून परत जात असताना तोटंबा घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कमांडर जीप रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन जोरदार आदळली. ही धडक एवढी भीषण होती की, वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात तुम सायलू, तुम गौराबाई आणि आवला गंगाधर यांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेही तेलंगणा राज्यातील कुबेर मंडळातील पारडी (जि. निर्मल) येथील रहिवासी असल्याचे समजते.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच तोटंबा परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. अपघातातील सातही जण गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने तेलंगणा राज्यात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत पडल्याने घटनास्थळावरील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. या घटनेमुळे तोटंबा परिसरासह तेलंगणातील पारडी गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

























































