
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृत्यूचा दाखला अखेर त्यांच्या नातेवाईकांना आज मिळाला. हा दाखला मिळवण्यासाठी त्यांचे पती राजू गोरे आणि कन्या सुची यांनी गेली १७ महिने संघर्ष केला. अश्विनी यांची हत्या होऊन दहा वर्षे लोटली असून मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावून दीड वर्ष झाले आहे. तरीही मृत्यूचा दाखला देण्यास पनवेल महापालिकेकडून टाळाटाळ केली जात होती. मात्र गोरे कुटुंबाच्या संघर्षासमोर प्रशासन अखेर झुकले आहे.
अश्विनी बिद्रे यांच्या मृत्यू दाखल्यासाठी त्यांचे पती राजू गोरे गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा करीत होते. त्यांनी पनवेल तहसील कार्यालयात दाद मागितली होती. त्यानुसार पनवेलच्या कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार मीनल भामरे-भोसले यांनी सर्व कायदेशीर बाबी, पोलीस अहवाल व न्यायालयीन निकालाची पडताळणी करून ३१ जुलै रोजी मृत्यू दाखला देण्याचे आदेश पनवेल महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र त्यानंतरही पालिका प्रशासन मृत्यू दाखला देण्यास टाळाटाळ करीत होते. या प्रकरणी प्रसार माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर पनवेल महापालिकेच्या कळंबोली विभाग कार्यालयाने दोनच दिवसांत दाखला तयार करून तो राजू गोरे यांना दिला आहे.
न्याय मिळवण्यासाठी पावलोपावली संघर्ष
बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हा पोलीस दलाचा लाडका अधिकारी असल्यामुळे न्याय मिळवण्यासाठी अश्विनी यांच्या नातेवाईकांना पावलोपावली संघर्ष करावा लागला. सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. मात्र तपास अधिकारी संगीता अल्फान्सो आणि विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यामुळे कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा झाली. आताही कुटुंबाला अश्विनी यांच्या मृत्यू दाखल्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागला होता.




























































