
कोलकातामधील आर. जी. कर रुग्णालयात बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित डॉक्टरची आई आणि भाजपच्या आमदार रत्ना देवनाथ यांनी सीबीआयच्या तपासावर संताप व्यक्त करत भाजप सरकारवर टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार जाऊन भाजपचे सरकार आले आहे. तरीही माझ्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत, असा गंभीर आरोप त्यांनी आपल्याच भाजप सरकारवर केला आहे. बॅरकपूर येथील एका आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नवीन विशेष तपास पथक स्थापन केल्यानंतर रत्ना देवनाथ यांनी थेट सीबीआयच्या कार्यपद्धतीला लक्ष्य केले.
सीबीआयने सांगितले की, आरोपी डॉक्टर आहेत. त्यांना अशा प्रकारे थेट अटक केली जाऊ शकत नाही. कोर्टानेही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला आहे. परंतु, माझी मुलगीही एक डॉक्टरच होती ना? जर एखादा डॉक्टर गुन्हेगार असेल, तो माझ्या मुलीच्या हत्येत सामील असेल तर त्याला अटक का केली जाऊ शकत नाही, गुन्हेगाराला डॉक्टर असल्यामुळे सूट दिली जातेय का? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. सरकार बदलल्यावर सर्व काही ठीक होईल, असे मला सांगण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात काहीच बदललेले नाही. न्याय देण्याची प्रक्रियाच ठप्प झाली आहे, असा गंभीर आरोप करत रत्ना यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
राजकारणात यायचं नव्हतं
मला कधीच राजकारणात यायचं नव्हतं. माझी मुलगी नेहमी मला म्हणायची. आपण राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे. मुलीच्या मृत्यूनंतर आम्हाला राजकारणात येण्याचा कोणताही आनंद नव्हता. पण आम्हाला सांगण्यात आले की, पश्चिम बंगालमधील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे, असेही त्या म्हणाल्या.

























































