
ऑडी आणि पोर्शे या कार ब्रँड्सची मूळ कंपनी फॉक्सवेगन ग्रुपने मोठी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीने सर्वानुमते ‘फ्युचर प्लॅन 2030’ या पुनर्रचना योजनेला मंजुरी दिली आहे. या नव्या योजनेनुसार जागतिक स्तरावर आणखी 50,000 कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असून या निर्णयामुळे एकूण एक लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
कंपनीचा वाढलेला खर्च कमी करणे आणि उत्पादन क्षमता वाढवणे या उद्देशाने फॉक्सवेगनने पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत कंपनी 2035 पर्यंत आपल्या वाहनांचा पोर्टफोलिओ निम्म्यावर आणणार आहे. वाहनांचे विविध प्रकार आणि कन्फिगरेशन्स जवळपास 75 टक्क्यांनी घटवले जातील. पंपनी आता विशिष्ट मॉडेलवर फोकस करून मोजक्याच गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणार आहे. कामगार प्रतिनिधी मंडळाच्या अध्यक्षा डॅनिएला कॅव्हॅलो यांनी पुनर्रचनेची गरज मान्य केली. मात्र याची संपूर्ण किंमत कर्मचारी मोजणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अमेरिकेचे आयात शुल्क परवडेना
अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कामुळे कंपनीची डोकेदुखी वाढली आहे. अमेरिकन
टॅरिफमुळेच कंपनीला वर्षाला पाच अब्ज युरोचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत फॉक्सवॅगनचा ऑपरेटिंग नफा 11.6 टक्क्यांनी घटून 5.9 अब्ज युरो झाला आहे.
चार प्लांट्सचे भविष्य टांगणीला
फॉक्सवेगन ही युरोपमधील सर्वाधिक वाहन उत्पादन करणारी कंपनी आहे. दरवर्षी गरजेपेक्षा पाच लाख अधिक वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता फॉक्सवेगनकडे आहे. या अतिरिक्त क्षमतेचा फटका जर्मनीतील कारखान्यांना बसला आहे. जर्मनीतील एमडेन, झ्विकाऊ, हॅनोव्हर आणि नेकार्सुल्म या चार प्रमुख उत्पादन प्लांट्सचे भविष्य टांगणीला लागले आहे.

























































