
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकण्याच्या निर्धाराने उतरलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवला दुसऱया फेरीतही विजयासाठी तब्बल पावणेपाच तास झुंजावे लागले. फ्रान्सच्या क्वेंटिन हेलिसने ज्वेरेवला अक्षरशः घाम फोडला. मात्र निर्णायक क्षणी खेळ उंचावत त्याने पाच सेटच्या थरारात 6-4, 4-6, 7-6 (3), 6-7 (3), 6-3 अशी बाजी मारली आणि स्पर्धेच्या तिसऱया फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्यांदा पाच सेटचा सामना
पहिल्या फेरीतही पाच सेटचा सामना जिंकलेल्या झ्वेरेवला दुसऱ्या फेरीतही विजयासाठी मोठी किंमत मोजावी लागली. आर्थर ऍश स्टेडियमवर तब्बल 4 तास 53 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात हेलिसने झ्वेरेवसमोर कडवे आव्हान उभे केले होते. पण ज्वेरेवने संयम राखला आणि प्रत्येक सेटागणिक आपला खेळ अधिक धारदार करत सामना जिंकला.























































