
नेपाळमधील या पुराच्या घटनेत त्रिशुली-3 ‘ए’ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अनेक कामगार अडल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्या अनुषंगाने त्रिशुली-3 ‘ए’ प्रकल्पाच्या बोगद्यात बेपत्ता कामगारांचा शोध घेतला जात होता. यासाठी नेपाळच्या सैन्याकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत होते. या रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान तब्बल 9 दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या 2 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे.
9 दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या अभियंता संजय साह आणि कबीर महर्जन यांची सुटका करण्यात आली आहे. यावेळी संजय साह यांनी सांगितले की, मृत्यू आणि जीवन यांच्यातील या अनिश्चित काळात आपण सतत ‘हरे कृष्णा’चा जप करत होतो. कामगाराने सुखरूप बाहेर आल्यानंतर त्यांच्या कठीण प्रसंगाचा थरारक अनुभव सांगितला. आपण सतत हरे कृष्णाचा जप करत होतो, त्यामुळे मला जगण्याचे बळ मिळाले, असे म्हणत या कामगाराने आपल्याला दुसरे आयुष्य मिळाल्याची भावुक प्रतिक्रिया दिली. बचाव पथकाने या दोन कामगारांना शुक्रवारी सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. या घटनेला 9 दिवस उलटून गेल्यामुळे आता बोगद्यात कोणी जिवंत सापडेल ही आशा मावळली होती; पण असे असतानाच शुक्रवारी 2 कामगारांची चमत्कारिकरीत्या सुटका करण्यात आली आहे.

























































