आदिवासी वस्ती अंधारात बुडाली; भाकरीवाडीचे रोहित्र चोरट्यांनी फोडले, तांब्याची कॉइल आणि ऑइल चोरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांची नजर आता महावितरणच्या रोहित्रावर (ट्रान्सफॉर्मर) वळली आहे. किन्हवली येथील मुख्य रस्त्याच्या शेजारी असलेल्या भाकरीवाडी येथील विजेचे रोहित्रच चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडले. त्यानंतर त्यातील उच्च दर्जाची तांब्याची कॉइल आणि किमती ऑइल चोरून नेले. त्यामुळे भाकरीवाडीवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

वाहनांची अहोरात्र वर्दळ असलेल्या किन्हवली, सरळगाव रस्त्याच्या कडेलाच भाकरीवाडी ही आदिवासी वस्ती आहे. या वस्तीच्या वीज पुरवठ्यासाठी ६३ वेव्हीचे रोहित्र बसवण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी हे विजेचे रोहित्र फोडून त्यातील तांब्याची कॉइल व तेल असा किमती ऐवज चोरून नेला. त्यामुळे भाकरी वाडीची वस्तीच अंधारात बुडाली आहे. या चोरट्यांच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्यात येतील, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी व्यक्त केला.

विंचू, सर्पदंशाची भीती भाकरीवाडी

आदिवासी शेजारीच वनविभागाचा ‘मियांवाकी’ हा जलदगतीने वाढलेला घनदाट झाडांचा समूह आहे. या ठिकाणी विंचू, सर्प किंवा तत्सम विषारी कीटकांचा संचार असल्याने हे सरपटणारे प्राणी वस्तीकडे येऊन दंश होण्याची भीती आहे.

चोरीचा सोपा मार्ग

महावितरणचे रोहित्र हे वस्तीपासून थोडे लांब वर्दळ नसलेल्या ठिकाणी असतात. या रोहित्रांमधील तांब्याच्या कॉइल या उच्च दर्जाच्या व महागड्या असतात. यातील ऑइलला मोठी मागणी आहे. त्यामुळे चोरट्यांनी रोहित्र फोडण्याचा सोपा मार्ग अवलंबल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याआधी सारंगपुरी, वेहळोली आणि डोळखांबशेजारील साकुर्ली या ठिकाणी चोरट्यांनी रोहित्र फोडले होते. या घटनेतील चार आरोपींकडून रोहित्र चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ‘गेल्या सहा महिन्यांत किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सारंगपुरी, वेहळोली व डोळखांबशेजारील साकुर्ली या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारच्या चोऱ्या झाल्या होत्या. या घटनेतील चार आरोपींकडून पोलिसांनी रोहित्र चोरीतील मुद्देमाल जप्त केला होता. चालू स्थितीतील रोहित्र बंद करून त्यातील किमती ऑइल व धातू चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय होण्याअगोदरच तिच्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी सांगितले.’