
आधी काम पूर्ण करून नंतर निविदा काढण्याचा कारनामा नवी मुंबई महापालिकेच्या विद्युत विभागाने चक्क दुसऱ्यांदा केला आहे. फॉर्म्युला चार नाइट रेसिंग स्पर्धेसाठी नेरूळ येथील नवी मुंबई ज्वेल उद्यान परिसरातील रस्ता दुभाजकावरील पथदिवे स्थलांतरित केल्यानंतर या कामाची निविदा काढण्यात आली असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख समीर बागवान यांनी केला आहे. त्यामुळे २१ लाख रुपये खर्चाचे हे काम वादाच्या भोक्ऱ्यात सापडले आहे.
वंडर्स पार्कमध्ये भूमिगत विद्युत केबल टाकण्याचे काम पालिकेच्या विद्युत विभागाने प्रथम करून नंतर या कामाची निविदा काढली होती. संबंधित कामाचा प्रस्ताव स्थायी समितीत आल्यानंतर एकच गदारोळ उडाला होता. आता पुन्हा दुसऱ्यांदा विद्युत विभागाने असाच कारनामा केला आहे. नेरुळ येथील स्ट्रीट लाइटचे खांब स्थलांतरित करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर निविदा काढण्यात आली आहे. या कामाच्या अंदाजपत्रकात ९० नग आरसीसी पायाभरणी, सुमारे २ हजार ३९५ मीटर विद्युत केबल, २ हजार १५ मीटर वाहिनी, ९० पथदिवे खांबांसाठी विद्युत यंत्रणा तसेच विविध प्रकारचे पथदिवे खांब व दिवे यांचा समावेश आहे. दरम्यान, स्ट्रीट लाइटचे पोल स्थलांतरित करण्याचे काम तातडीचे होते. त्यामुळे हे काम करण्यात आले असून आता निविदा काढण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता तानाजी चव्हाण यांनी दिली आहे.
दोषींवर कारवाई करा
अंदाजपत्रकातील प्रमाण, प्रत्यक्ष करण्यात आलेले काम आणि प्रत्यक्ष आवश्यक असलेले काम यांची मोजमापासह तांत्रिक पडताळणी करण्यात यावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी समीर बागवान यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.




























































