बापटांच्या मुद्द्याला पुणेकरांचा पाठिंबा; DJ संदर्भात तात्काळ निर्णय घेण्याऐवजी CM लोकसंवादाची भाषा का करताहेत? – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यानंद बापट यांनी ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवला आणि पुणेकरांनी त्याला पाठिंबा दिला. भूकंपाच्या धक्क्याप्रमाणे हादरे देणार्‍या ध्वनीप्रदूषणाचा हा विषय असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दिवसात हा प्रश्न सोडवायला हवा. डीजेसंदर्भात महाराष्ट्रात वाद पेटलेला असताना ते लोकसंवादाची भाषा का करतात? असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच विद्यानंद बापट यांना आता दिमागी नक्षली ठरवले जाईल, असेही ते शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, भूकंपाप्रमाणे हादरे देणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा हा प्रश्न असून मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात हा प्रश्न सोडवायला पाहिजे. अजित पवारांना, एकनाथ शिंदेंना शपथ द्यायची की नाही, किंवा त्यांच्या लोकांचे ऐकायचे की नाही, आमदारांची खरेदी-विक्री किती कोटीला करायची हे प्रश्न ते एका दिवसात मार्गा लावतात. मग डीजे संदर्भात महाराष्ट्रात वाद पेटलेला असताना ते लोकसंवादाची भाषा का करतात? करायला पाहिजे, हे योग्य. पण आताच त्यांना लोकसंवाद का आठवला?

मनोज जरांगे-पाटील गेल्या आठ-दहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. तिकडे संवाद, चर्चा का होत नाही. ऐन गणपतीमध्ये एका मोठ्या समाजाचा नेता आंदोलन करतो, त्याच्या भोवती हजारो लोक आहेत आणि ते मुंबईला यायला निघाले आहेत. त्यांच्याशी तुम्ही संवाद करत नाहीत. तुम्हाला लाज वाटते का? पण बापट प्रकरणात तुम्ही लोकसंवादाची भाषा करताय. कारण हे लोक आंदोलन होण्याची शक्यता वाटते, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

नागपूरला वेगळा न्याय, पुण्यात वेगळा आणि मुंबईत वेगळा. डीजे हवा की नको हे सरकारने ठरवावे आणि अख्ख्या महाराष्ट्रात निर्णयाची अंमलबजावणी करावी. मराठीच्या संदर्भात निर्णय घेतला आणि 1 वर्षांची मुदतवाढ दिली. तिथे लोकसंवाद केला का? तुमच्या परिवहन मंत्र्यांनी मराठी यायला पाहिजे अशी भूमिका घेतल्यावर तुम्ही तो विषय चिघळू दिला आणि त्यानंतर अर्ध्या मिनिटात आदेश काढला. तेव्हा लोकसंवाद केला का? मराठी संस्था, मराठी संघटना, मराठी ग्रथसंग्रहालय, मराठी संदर्भात कार्य करणारे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली का? तुमच्या मनात आले आणि आदेश जाहीर केला, असेही संजय राऊत म्हणाले.