काळ्या पिवळ्या टॅक्सींमध्ये नकली डिव्हाईस; प्रवाशांची लुटमार करणाऱ्या टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काळ्या-पिवळ्या टॅक्सींमधील मीटरमध्ये बनावट डिव्हाईस बसवून कृत्रिम भाडेवाढ करून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे; तसेच त्यांच्याकडून मारुती सुझुकी कंपनीच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी जप्त केल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर प्रवाशांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दहिसर पूर्व येथील अशोक वनजवळील गोकुळ आनंद हॉटेलच्या शेजारी प्रवाशांची वाट बघत असलेले टॅक्सीचालक मीटरमध्ये बेकायदेशीर इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट या उपकरणाचा वापर करून प्रवाशांची फसवणूक करत असल्याची खबर साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश साळुंके यांना मिळाली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने व जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी आपले सहकारी मारुती सांगळे, नीलेश शिवाजी साळुंके तसेच पोलीस हवालदार हेमंत बाबुराव विचारे, सुनील चंद्रकांत राठोड, संतोष काशीनाथ भागवत व हृषिकेश प्रवीण मोरे यांना सोबत घेऊन गोकुळ आनंद हॉटेलजवळ सापळा रचला आणि भाडे मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या जोएब अल्ताफ देशमुख (३२), अमीन रमझान पठाण (३१), रियाझ अब्दुलगानी शेख (४५), नाजीर इब्राहिम पटेल (५७) व आनंदकुमार नानाकप्रसाद राय (६०) अशा पाच आरोपींना अटक केली.

मालाड, कांदिवली व गोरेगावमध्ये दहशत; १० गुंड मुंबईतून हद्दपार

अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना व उपायुक्त गजानन राजमाने यांच्या आदेशावरून उत्तर मुंबईतील गोरेगाव (आरे कॉलनी), मालाड (कुरारगाव), कांदिवली (नरसीपाडा) व बोरिवली पूर्व (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) आदी ठिकाणी हप्तेवसुलीसाठी शस्त्रांचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना व नागरिकांना मारहाण करणाऱ्या दहा सराईत गुंडांना मुंबईतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर मुंबईतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.