
‘मोदी-शहांच्या दहशतीला ब्रेक लागल्यामुळे भाजपमध्ये गेल्या १० वर्षांत झाली नाही अशी बंडाळी निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदींना केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करायचे असतानाही आरएसएसशी संबंधित चार मंत्र्यांनी राजीनामे द्यायला दिलेला नकार ही मोदींच्या पतनाची सुरुवात आहे,’ अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज हल्लाबोल केला.
‘महाराष्ट्र दिनमान’ आयोजित ‘दिनमान साहित्य उत्सवात’ ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे अंतरंग उलगडणाऱ्या खास मुलाखतीत ते बोलत होते. या वेळी राजर्षी शाहू स्मारक भवन गर्दीने ओसंडून गेले होते. ‘महाराष्ट्र दिनमान’चे संपादक विजय चोरमारे आणि पत्रकार अमेय तिरोडकर यांनी संजय राऊत यांची मुलाखत घेतली. या वेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमित शहांचा केंद्रीय राजकारणातला प्रवेश ही नरेंद्र मोदींची सर्वांत मोठी चूक होती. ‘‘मोदी ज्यांचा ‘कामाचा माणूस’ असा उल्लेख करतात, त्या अमित शहांनी पक्षांतराला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे,’’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मागे हटायचे नाही, हे शिकवले. त्याचेच आचरण आम्ही करत आहोत,’ असे सांगत, मुंबई काबीज करण्यासाठीच शहांनी शिवसेना फोडल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. ‘मी बाळासाहेब ठाकरे यांचा माणूस आहे. माझी बाळासाहेबांवर देवापेक्षा जास्त श्रद्धा आहे,’ असे संजय राऊत यांनी सांगितले.
ज्या कोबाड गांधींच्या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन आपण ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले, ते कोबाड गांधींचे पुस्तक मोदींनी वाचावे; म्हणजे त्यांना ‘दिमागी नक्षल’ काय आहे, हे समजेल.
तुरुंगाच्या भीतीने गद्दारांनी पळ काढला
‘तुरुंगात राहिल्यामुळे माझे मानसिक खच्चीकरण झाले नाही, तर तुरुंगाच्या भीतीने ज्यांचे खच्चीकरण झाले त्यांनी पळ काढला,’ अशा शब्दांत त्यांनी गद्दारांना जबरदस्त टोला लगावला. आपण ज्या वेळी तुरुंगात होतो, त्या वेळी मोदी-शहांनी अनेक मोठ्या उद्योगपतींना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा गैरवापर करून डांबले, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.






























































