
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच सराईत व समाजकंटक गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरात कठोर कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. विविध गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करताना ७०० हून अधिक जणांना तडीपार करण्यात आले आहे.
गंभीर आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ६७ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली. तसेच धोकादायक प्रवृत्तीच्या १२ गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीविरोधातही मुंबई पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून १३ जणांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईसोबतच सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आगामी काळातही गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू ठेवली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





























































