लातूर-देवरूख एसटी नियमावर बोट ठेवून आंबा घाटात अडवली, पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूरहून देवरूखकडे जाणाऱ्या एसटी बसला आंबा घाटात प्रशासकीय नियमांचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापुरातून सुटण्यास काहीसा उशीर झालेली ही बस शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आंबा घाटात पोहोचली असता, आंबा पोलिसांनी ‘सकाळी 7 ते सायंकाळी 7’ या वाहतूक नियमावर बोट ठेवत बस अडवून धरली. यामुळे ऐन रात्री प्रवाशांना ताटकळत राहावे लागले असून त्यांचे प्रचंड हाल झाले.

​मिळालेल्या माहितीनुसार, सध्या प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आंबा घाटातून एसटी बस वाहतुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशी वेळ निश्चित केली आहे. मात्र, रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अडथळ्यांमुळे लातूर-देवरूख गाडीला कोल्हापुरातून पुढे येण्यास सुमारे एक तास उशीर झाला. गाडी रात्री 8 च्या सुमारास आंबा घाटात दाखल झाली, परंतु पोलिसांनी नियमांचे काटेकोर पालन करत गाडी पुढे सोडण्यास स्पष्ट नकार दिला.

घाटाच्या तोंडावरच बस अडवल्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. नियमांची अंमलबजावणी जरूर व्हावी, पण वाहतूक कोंडीमुळे झालेला उशीर विचारात घेऊन तातडीचा मार्ग काढायला हवा होता, अशी उद्विग्न प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. ​तब्बल अडीच तासांच्या खोळंब्यानंतर, अखेर रात्री 10.30 वाजता पोलिसांनी एसटी बसला देवरूखच्या दिशेने प्रवास सुरू करण्याची परवानगी दिली. वाहतूक कोंडीच्या अपवादात्मक परिस्थितीत प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी प्रशासनाने लवचिकता दाखवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.