SIR च्या माध्यमातून मतदार याद्यांमधून काँग्रेसची मते वगळण्याचा भाजपचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील भाजपप्रणित सरकार बिगर-भाजप शासित राज्यांमध्ये मतदार याद्यांच्या एसआयआरच्या नावाखाली मतचोरीचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी केला आहे. तेलंगणामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेस समर्थकांची मते यादीतून वगळण्याचा प्रयत्न सुरू असून, भाजप आणि बीआरएस या दोन्ही पक्षांची यात छुपी मिलीभगत असल्याचा दावाही त्यांनी केला.

आपल्या कोडंगल विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये मतदारांची नावे वगळून भाजपने निवडणुका जिंकल्या होत्या, आता तोच पॅटर्न तेलंगणात राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मतदार याद्यांच्या फेरपरीक्षणाच्या नावाखाली विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक मतदारांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. शुल्लक तांत्रिक त्रुटींचे कारण पुढे करून गरीब मतदारांची नावे यादीतून वगळली जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.

यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना नमवण्यासाठी भाजपने अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचा गैरवापर केला, तर आता ते थेट मतदार याद्यांमधून मतदारांची नावे गायब करण्याचे डावपेच आखत आहेत, असा आरोप रेड्डी यांनी केला.