
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चालवत असलेले संकुचित आणि जातीयवादी राजकारण ही आज देशासमोरील सर्वात मोठी समस्या बनली आहे, अशी टीका काँग्रेस खासदार आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर उत्तराखंडमधील मैदानावर करण्यात आलेल्या शुद्धीकरणाच्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करताना ते असे म्हणाले आहेत.
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर ८ ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा झाली होती. या सभेनंतर त्या जागेवर शुद्धीकरण विधी करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर बोलताना वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असणाऱ्या मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणांनंतर अशी कृती करणे अत्यंत अस्वस्थ करणारे असून, हा थेट अस्पृश्यतेला खतपाणी घालणारा प्रकार आहे. केरळसारख्या प्रबोधनकारी भूमीत अशा अनिष्ट रूढी-परंपरांचा इतिहास सामाजिक सुधारणा चळवळींपूर्वी पाहायला मिळत होता, असेही ते म्हणाले.
तसेच या प्रकाराचे समर्थन केले जात असून जेव्हा राहुल गांधी यांनी यावर आवाज उठवला, तेव्हा त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला, असे सांगत वेणुगोपाल यांनी भाजपच्या भूमिकेवर निशाणा साधला. देशातील तरुणांसमोरील बेकारी आणि कमकुवत आर्थिक परिस्थितीवरून लक्ष हटवण्यासाठीच अशी जातीयवादी वक्तव्ये आणि कृती केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ANI ने यासंदभात वृत्त दिले आहे.



























































