मान्यता नसलेल्या सहा पक्षांना 1700 कोटींच्या देणग्या, पैसे नेमके कोणी दिले आणि कुठे गेले? काँग्रेससह पाच राष्ट्रीय पक्षांना मागे टाकले, सर्व पक्षांचे मूळ गुजरातमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये मूळ असलेल्या व मान्यताप्राप्त नसलेल्या सहा राजकीय पक्षांना 2023-24 या वर्षात तब्बल 1700 कोटींच्या देणग्या मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आम जनमत पार्टी नावाचा पक्ष यात आघाडीवर असून या पक्षाला सर्वाधिक 620 कोटी रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे, देशात एकही कार्यालय नसलेल्या या पक्षाचे बँक अकाऊंट चालू असून त्यात व्यवहारही होत आहेत. त्यामुळे या पक्षांना इतके पैसे कोणी दिले आणि ते कुठे गेले, यावर चर्चा सुरू झाली आहे.

निवडणूक आयोग आणि असोसिएशन ऑफ डेमोव्रॅटिक रिफॉर्म्सच्या आकडेवारीतून ही माहिती उघड झाली आहे. भरगच्च देणग्या मिळवणारे हे सहाही पक्ष नोंदणीकृत आहेत. मात्र, त्यांना मान्यता मिळालेली नाही. यात आम जनमत पार्टी, भारतीय नॅशनल जनता दल, गरीब कल्याण पार्टी, न्यू इंडिया युनायटेड पार्टी, सत्यवादी रक्षक पार्टी आणि स्वतंत्रता अभिव्यक्ती पार्टीचा समावेश आहे. या सहा पक्षांना मिळालेल्या एकूण देणग्या काँग्रेस, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टी यांच्यापेक्षाही जास्त आहेत. या पाच राष्ट्रीय पक्षांना 2023-24 मध्ये एकूण 1480 कोटी रुपये मिळाले आहेत. देशातील सर्वात जुना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला 2023-24 मध्ये 281 कोटी देणगी मिळाली होती. त्याच वर्षात आम जनमत पार्टीला काँग्रेसपेक्षा दुपटीहून अधिक देणगी मिळाली.

पक्ष फक्त ऑनलाइन

आम जनमत पार्टी हा पक्ष फक्त ऑनलाइन आहे. पक्षाच्या वेबसाइटवर गौरव मिश्रा हे अध्यक्ष व धर्मेंद्र वैष्णव हे खजिनदार  दिसत आहेत. वैष्णव यांनी हे पक्ष बंद केल्याचे सांगितले. इतके पैसे मिळालेला पक्ष बंद झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

एजेपीच्या माजी अध्यक्षा आता भाजपमध्ये

आम जनमत पार्टीचे (एजेपी) भारतीय जनता पक्षाशी कनेक्शन असल्याचा संशय आहे. आम जनमत पार्टीच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा अनामिका पासवान या सध्या बिहार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी एजेपीच्या अध्यक्षपदाचा 2022 रोजी राजीनामा दिला आहे. त्यानंतर गौरव मिश्रा अध्यक्ष झाले व पक्षाचे कार्यालय बिहारमधून गुजरातला स्थलांतरित झाले. मात्र, आता पक्षाचे कार्यालय कुठेही नाही.