
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात मलेरिया आणि संसर्गजन्य आजारांमुळे ३० आदिवासी बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या दुर्दैवी घटनेवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त करत, हे राज्य सरकारचे पूर्ण अपयश असल्याचे म्हटले आहे. बालकांच्या जीवाशी कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्वतः यात लक्ष घालून तत्काळ मदत आणि आरोग्य सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत मध्य प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, बालाघाटमधील आदिवासी बालकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत चिंताजनक आणि मन हेलावून टाकणारी आहे. केवळ आजारच नव्हे, तर पिण्याचे शुद्ध पाणी, पुरेसे पोषण आणि वेळेवर वैद्यकीय उपचारांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव चिमुकल्यांचा जीव घेत आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घटनास्थळी आरोग्य तपासणी, उपचार आणि मदत कार्य सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
बालाघाटमधील बैहर-बिरसा या आदिवासीबहुल भागात गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. बैगा आदिवासी कुटुंबातील एका १० वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या ३० वर पोहोचली आहे. या भागात आरोग्य पथकांनी केलेल्या घरोघरी सर्वेक्षणात मलेरिया, अतिसार, अंगावर पुरळ उठणे आणि त्वचारोगाने ग्रस्त असलेले सुमारे ८०० रुग्ण आढळून आले आहेत. सतत होणाऱ्या मुलांच्या मृत्यूंमुळे स्थानिक आदिवासी पाड्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.




























































