
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पेपरफुटीचे धागेदोरे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) गणेश देवरे यांचे एमपीएससीने घेतलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील घोटाळ्यातील तक्रारदार आणि आरोपी गौरव पाटील याच्याशी थेट संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत आयोगाच्या तीन कर्मचाऱ्यांसह सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील गौरव पाटील याच्या नंदुरबार येथील घरी झिरवाळ यांचे ओएसडी देवरे हे भाडेकरू म्हणून राहत असल्याचे तपासात उघडकीस आले. औषध निरीक्षक पदाच्या भरतीतील घोटाळा उघडकीस आल्यापासून देवरे हे मंत्री कार्यालयात फिरकलेले नाहीत. यामुळे या प्रकरणात मंत्री कार्यालयाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, देवरे यांच्या मंत्री कार्यालयातील नेमणुकीचा रीतसर आदेश नव्हता; ते उसनवारी तत्त्वावर मंत्री कार्यालयात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे.
पेपरफुटीशी संबंध नाही – झिरवाळ “पेपरफुटीशी आपल्या मंत्रालयाचा आणि कर्मचाऱ्यांचा कुठलाही संबंध नाही. सर्व विभागांतील भरती प्रक्रिया ही एमपीएससीकडून राबवली जाते. या प्रक्रियेशी आपल्या खात्याचा आणि आपला काहीही संबंध नाही,” अशी प्रतिक्रिया मंत्री झिरवाळ यांनी दिली.



























































