
>>भावेश ब्राह्मणकर
किल्लईने हवामान बदल थांबवलेला नाही. समुद्रपातळी वाढणे थांबवलेले नाही. पीवादळे येणेही बंद होणार नाही. मग किल्लईचे यश नेमके कुठे आहे?
समुद्रकिनाऱयावर वसलेल्या गावासाठी समुद्र हा वरदानही असतो आणि संकटही. मासेमारी, पर्यटन, खारफुटीची जंगले, जलमार्ग आणि समुद्राशी जोडलेली उपजीविका यामुळे गावाचे जीवन समुद्राभोवती फिरत असते, पण तोच समुद्र जेव्हा पीवादळाच्या रूपाने धडकतो, भरतीचे पाणी गावात शिरते, गोडय़ा पाण्यात क्षार मिसळतात आणि वीजपुरवठा दिवसेंदिवस खंडित होतो, तेव्हा विकासाची पारंपरिक संकल्पना अपुरी ठरते. तामीळनाडूतील कडलूर जिह्यातील किल्लई हे गाव याच बदलत्या वास्तवाचे उत्तर शोधत आहे. 22 जुलै 2026 रोजी किल्लई हे तामीळनाडूतील पहिले पूर्णपणे कार्यान्वित हवामान-लवचिक गाव ठरले. या गावाने एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. हवामान बदलाला तोंड देताना निसर्गापासून गावाचे संरक्षण करायचे की निसर्गालाच गावाच्या संरक्षणाची ताकद बनवायचे? किल्लईने मात्र दुसरा मार्ग निवडला आहे. किल्लईची भौगोलिक अडचणच हीच त्याची ताकद बनली आहे.
पिचावरमच्या प्रसिद्ध खारफुटी परिसंस्थेजवळ असलेले किल्लई पीवादळे, वादळी लाटा, पूर, किनारी धूप आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या घुसखोरीसारख्या संकटांना सामोरे जात आले आहे. वीजपुरवठा खंडित होणे हीदेखील मोठी समस्या होती. मात्र याच परिसरातील खारफुटी, पाणथळ प्रदेश आणि जलमार्ग हे स्थानिक अर्थव्यवस्थेचे आधार आहेत. मासेमारी आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांचा या परिसंस्थेशी थेट संबंध आहे. म्हणजेच किल्लईसमोर समस्या आणि समाधान एकाच ठिकाणी होते. ते म्हणजे निसर्गात.
किल्लईतील बकिंगहॅम कालव्याचा सुमारे तीन किलोमीटरचा पट्टा गाळ, प्लास्टिक आणि अनावश्यक वनस्पतींमुळे अडथळलेला होता. तो साफ करून, गाळ काढून पुन्हा जलप्रवाह सुरळीत करण्याचे काम करण्यात आले. विशेष म्हणजे हे काम केवळ प्रशासनाचे राहिले नाही. सुमारे 600 स्थानिक नागरिकांनी यात सहभाग घेतला आणि अंदाजे 750 किलो प्लास्टिक कचरा काढण्यात मदत केली. त्यानंतर कालव्याच्या काठावर सुमारे 3,000 स्थानिक खारफुटीची रोपे लावण्यात आली.
कालवा स्वच्छ केल्यामुळे पाण्याचा प्रवाह आणि भरती-ओहोटीचा नैसर्गिक संबंध सुधारतो. खारफुटीची झाडे समुद्राच्या लाटा आणि वादळी भरतीपासून नैसर्गिक संरक्षण देतात. त्याचबरोबर पाणथळ परिसंस्थेचे आरोग्य सुधारल्याने मासे आणि इतर जलजीवांसाठी अधिवास निर्माण होतो. म्हणजे एकाच उपायातून पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक अर्थव्यवस्था या तिन्ही गोष्टी मजबूत होतात. यालाच खरा शाश्वत विकास म्हणावा लागेल.
पर्यटन महत्त्वाचे आहे, पण पर्यटनामुळेच परिसंस्थेवर ताण वाढणार असेल तर तो विकास कितपत शाश्वत? किल्लईने डिझेलऐवजी सौरऊर्जेवर आधारित बोट स्वीकारली. त्यामुळे धूर आणि उत्सर्जन कमी होते, आवाज कमी होतो आणि नाजूक खारफुटी परिसंस्थेवरील परिणामही कमी करण्यास मदत होते. सार्वजनिक इमारतींवर सौरऊर्जा व्यवस्था, ऊर्जा कार्यक्षमतेचे उपाय आणि सौर पथदिवे यांनाही या उपामात स्थान देण्यात आले आहे. पीवादळानंतर वीजपुरवठा खंडित झाल्यास गाव अधिक काळ अंधारात राहू नये, ही या उपायामागची व्यावहारिक भूमिका आहे. केवळ पूर थांबवणे नव्हे, आपत्ती आली तरी जीवन सुरळीत सुरू ठेवण्याची क्षमता निर्माण करणे होय.
स्थानिक नागरिक कालवा स्वच्छ करण्यात सहभागी झाले. स्थानिक परिसंस्थेवर अवलंबून असलेल्या समुदायांच्या अनुभवांचा प्रकल्पाच्या नियोजनात विचार करण्यात आला. महिलांसह वंचित समुदायांसाठी कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यायी उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
किल्लईच्या ‘ग्रीन स्कूल’ उपामात विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण, वृक्षलागवड, कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धनाशी जोडले जात आहे. यामागचा विचार दूरगामी आहे. आज लावलेले खारफुटीचे रोप उद्याच्या पीवादळापासून संरक्षण देईल, पण ते रोप जपणारी पिढी तयार झाली नाही तर संपूर्ण प्रयत्न अपुरा ठरेल. हवामान बदलाशी लढा हा एका योजनेचा किंवा पाच वर्षांच्या प्रकल्पाचा विषय नाही. तो पुढील अनेक पिढय़ांचा प्रश्न आहे. म्हणून हवामान साक्षरता ही हवामान लवचिकतेची पहिली पायरी आहे.
तामीळनाडूत किल्लईसह 11 संवेदनशील भागांत हवामान-लवचिक गावांचे प्रारूप विकसित करण्याचे काम सुरू आहे. वर्ल्ड रिसोर्स इंडिया ही संस्था आणि तामीळनाडू सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहेत. या व्यापक कार्पामातून सुमारे 27 लाख लोकांपर्यंत हवामान-लवचिकतेशी संबंधित उपाय पोहोचल्याचे संस्था सांगते. कोकणातील अनेक गावांनी किल्लईचा आदर्श घ्यायला हवा. आपत्ती येणारच आहे, हे मान्य करूनही तिची किंमत कमी करण्याची तयारी गावाने सुरू केली आहे. खारफुटी म्हणजे संरक्षक भिंत. कालवा म्हणजे जलनियोजनाची व्यवस्था. सौरऊर्जा म्हणजे आपत्तीनंतरची ऊर्जा सुरक्षा. स्थानिक सहभाग म्हणजे व्यवस्थेची सामाजिक हमी. मुलांचे पर्यावरण शिक्षण म्हणजे भविष्यातील संरक्षणाची गुंतवणूक आणि पर्यायी उपजीविका म्हणजे हवामानाच्या धक्क्यांनंतरही अर्थव्यवस्था उभी ठेवण्याची क्षमता. हे सर्व तुकडे जोडल्यावर ‘हवामान-लवचिक गाव’ तयार होते. शेवटी प्रश्न विकासाचा नाही, विकासाच्या दिशेचा आहे.
किल्लईची कथा म्हणूनच एका गावाच्या यशाची कथा नाही, ती भारताच्या भविष्यातील विकासाची दिशा दाखवणारा आरसा आहे. विकासाला निसर्गाचा शत्रू बनवण्याऐवजी निसर्गालाच विकासाचा भागीदार केले, तरच हवामान बदलाच्या काळात भारतातील गावे खऱ्या अर्थाने सुरक्षित, सक्षम आणि शाश्वत बनतील. किल्लईने सुरुवात केली आहे. आता
प्रश्न एवढाच-भारतामधील पुढचे किल्लई कोणते?
(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत)
[email protected]




























































