नगरसेवकांसाठी टॅब खरेदीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी गुंडाळला; आदित्य ठाकरे यांनी केला होता विरोध, आता ‘स्वदेशी’चे कारण देत प्रस्तावच रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांसाठी टॅब खरेदी करण्याचा निर्णय अखेर सत्ताधाऱयांनी गुंडाळला आहे. सत्ताधाऱयांच्या टॅब खरेदीमुळे मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचे सांगत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता. अखेर टॅब खरेदीला विरोध वाढल्याने सत्ताधाऱ्यांनी ‘जेम’ पोर्टलवर फक्त ‘स्वदेशी’ वस्तू खरेदी करता येत असल्याचे कारण देत ‘चायनामेड’ टॅब खरेदी करणार नाही, अशी पळवाट काढत प्रस्तावच रद्द केला.

पालिकेच्या समित्या आणि महासभेचे कामकाज कागदी अजेंडय़ाच्या माध्यमातून सुरू आहे. विविध समित्यांच्या बैठकींचे अजेंडे संबंधित सदस्यांना पाठविले जातात. या सर्व प्रक्रियेसाठी मोठा खर्च होतो असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला होता. यासाठी अॅप विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

भाजपवर नामुष्की

समिती अध्यक्षांसाठी गाडय़ा खरेदीवरून शिवसेनेसह विरोधकांनी आवाज उठवल्याने तो प्रस्तावदेखील रद्द करण्यात आला होता. शिवाय महापौरांच्या ‘सोशल मीडिया’ प्रसिद्धीवर 25 लाखांच्या खर्चाचा प्रस्तावदेखील विरोधकांच्या आक्षेपानंतर राखून ठेवण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी भाजपवर नामुष्की असल्याचे स्पष्ट होत आहे.

सत्ताधारी म्हणतात…

पालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया 27 वस्तूंसह अनेक  वस्तूंची खरेदी केंद्राच्या सूचनेनुसार ‘जेम’ पोर्टलवरून  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध समित्यांचे प्रस्ताव 13 इंच आकाराच्या टॅबवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय सत्ताधाऱयांनी घेतला होता.

मात्र ही खरेदी करताना केवळ भारतीय बनावटीच्या उपकरणांनाच प्राधान्य देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. मात्र आवश्यक दर्जाचे भारतीय बनावटीचे टॅब ‘जेम’ पोर्टलवर उपलब्ध नसल्याने हा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे सभागृह नेते भाजपचे गणेश खणकर यांनी सांगितले.