पीक विम्याबद्दल विचारले म्हणून शिंदेंच्या खासदाराची शेतकऱ्याला धक्काबुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे मिंधे गटात बदकउडी मारणारे गद्दार प्रश्न विचारताच सटकले! पीक विम्याबद्दल विचारणाऱ्या शेतकऱ्याला मिंधे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी अर्वाच्च शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. एवढेच नाहीतर अपमान करून कार्यालयातून हाकलून दिले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून खासदार संजय देशमुख यांच्या मस्तवालपणाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रावर एल निनोमुळे सध्या भीषण दुष्काळाचे सावट आहे. सोयाबीन, कापसासह सगळा खरीप हंगामच पाऊस नसल्यामुळे धोक्यात आला आहे. शेतकऱयांवर भयंकर संकट कोसळले असताना उपायांच्या नावाखाली मलमपट्टी करण्याचे काम चालू आहे. खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयात हीच व्यथा घेऊन पंढरी पाटील हा शेतकरी आला. पीक विम्याचा परतावा रखडला आहे. पाऊस नाही, दुष्काळ उंबरठय़ावर आला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करत आहात? असा प्रश्न विचारताच खासदार संजय देशमुख यांची सटकली. खासदार देशमुख यांनी पंढरी पाटील याला अर्वाच्च शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर पंढरी पाटील यांनी मी सर्व शेतकऱयांच्या वतीने बोलत असल्याचे सांगितले. परंतु बेभान झालेल्या खासदार देशमुख यांनी पंढरी पाटील यांना धक्काबुक्की केली. खासदारांच्या कार्यकर्त्यांनीही पंढरी पाटील यांचा अपमान करून त्यांना कार्यालयाबाहेर हाकलले.

हा सत्तेचा माज आहे, सोशल मीडियामध्ये संताप

या घटनेनंतर हा सत्तेचा माज आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत असून लोकप्रतिनिधींना शेतकऱ्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की नाही, निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या घरोघरी जाणारे नेते त्यांचे प्रश्न कधी ऐकणार, अशी विचारणा केली जात आहे.