
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
शून्यं केचिदशून्यमन्य, उपरीत्येके, सितं चापरे, कृष्णं चापि भवन्तमाहुरपि तु त्वा काश मन्यामहे ।
शब्दानां प्रभवश्च कश्चन भवान् विश्वावकाशप्रदो । दूर पङ्ककलङ्क सङ्करमयैर्दोपैरशेषैरसि ।।
ही आकाशाला उद्देशून केलेली अन्योक्ती आहे. काही लोक तुला शून्य म्हणतात, तर काही जण अशून्य म्हणजे अस्तित्व असलेले तत्त्व मानतात; काहींच्या मते तू वर पसरलेले आहेस, काही तुला श्वेत म्हणतात, तर काही कृष्णवर्णीय म्हणतात. पण आम्ही मात्र तुला आकाश मानतो. तू शब्दांच्या पलीकडे, अतिदूर असूनही शब्दांचा उगम होण्याचे स्थान आहेस; संपूर्ण विश्वाला तू अवकाश देतोस. आणि साऱया जगाला आपल्या विशाल अवकाशात सामावून घेऊनही, जगातील चिखल, कलंक, भेसळ आणि नाना प्रकारच्या दोषांचा तुला स्पर्शही होत नाही; तू त्या सर्वांपासून सर्वथा अलिप्त आणि निर्मळ आहेस. वरवर पाहता कवी आकाशाचे वर्णन करतो आहे; पण प्रत्यक्षात त्याला एखाद्या महान, उदार, निर्मळ व्यक्तीचे किंवा परम तत्त्वाचे गुण सांगायचे आहेत. श्रेष्ठ व्यक्ती सर्व प्रकारच्या माणसांना सामावून घेते; त्यांच्या दोषांशी, कलहाशी किंवा क्षुद्रतेशी संबंध आला तरी स्वतचे निर्मळपण गमावत नाही.






























































