
>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
[email protected]
स्त्रीचं भावविश्व काठोकाठ भरून पावणारी इंदिरा संतांची कविता… स्त्रीच्या हर्ष-विमर्षाचे, खोल वेदनांचे नाते त्यांच्या कवितेशी असावं इतकी त्यांची कविता आत्मनिष्ठ होती.
रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन
इंदिरा संत यांची ही कविता ‘मृण्मयी.’ 1951 साली आलेल्या ‘शेला’ या संग्रहातली. मातीशी असणारं स्त्राrचं नातं मनोमन मानणाऱ्या आणि परोपरीनं ते कवितेत रेखणाऱया बाईंची कविता कमालीची आत्मनिष्ठ आहे. त्यांची कविता वाचताना वाचकाच्या मनाशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा काही संदर्भ असतोच उभा. तो विसरू म्हणता नाही विसरता येत.
त्या मूळच्या इंदिरा दीक्षित. वडील मामलेदार होते, पण लहानपणीच पितृछत्र हरपलं आणि काकांच्या कडक शिस्तीत बालपण गेलं. पुढे काकांनी बेळगावी बिऱहाड केल्यावर तिथे पुढचं शिक्षण झालं. लहानपणी आई भूपाळ्या म्हणवून घेई, तर वडील रात्री विविध आख्यानं वाचीत. त्यामुळे न कळत्या वयातच त्यांच्यात साहित्याची आवड निर्माण झाली. लेखनाचा नादही होता. शालेय वयातच त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. ‘फुलांची परडी’ या नावाची कवितेची वही तयार झाली. पुढे पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे कवी, लेखक ना. मा. संत यांच्याशी परिचय झाला. कविताप्रेमात परस्परप्रेमाचा रेशीमधागाही गुंतत गेला आणि घरच्यांचा विरोध पत्करून 1935 मध्ये त्यांचा विवाह झाला.
अल्लडशी प्रीत माझी
सर तिला पाखराची
तुझ्या मनी आढळली
जागा तिला निवाऱ्याची
अशी निवाऱ्याची जागा लाभताच, ‘माझं स्वप्न माझ्या हातात आलं’ अशी त्यांची अत्यंत आनंदविभोर मनोवस्था झाली आणि 1946 मध्ये अवघ्या 11 वर्षांत या स्वप्नाची समाप्ती झाली. संतांचा अकाली मृत्यू झाला. बाईंची कविता या स्वप्नभंगाने निराळ्याच व्रतस्थ आत्मनिष्ठेची ताकद घेऊन प्रकटली. बाकी सगळ्यापासून एकटे पडलेले आणि या एकटेपणाची जाणीव सतत सोबत घेऊन जगणारे हे कविमन आहे. निसर्ग, प्रेम आणि प्रेमाच्या गाभ्यातली विरहवेदना यांचा एकवट प्रत्यय देणारे कविमन.
सहवास, शेला, मेंदी, मृगजळ, गर्भरेशीम असे 10 कवितासंग्रह. श्यामली, कदली आणि चैतू हे कथासंग्रह. मालनगाथा हे लोकगीतांचे संकलन आणि मृद्गंध हा ललित लेखसंग्रह व लहान मुलांसाठी तीन कवितासंग्रह ही मोजकी, पण अत्यंत सकस साहित्यसंपदा. त्यांच्या ‘गर्भरेशीम’ला 1983 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार लाभला. 85 वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्या सात दशकं कविता लिहीत होत्या.
तवंदी या लहानशा खेड्यात लहानपणी अनुभवलेला निसर्ग, तिथली साधी माणसं यांचा खोल ठसा त्यांच्या कविवृत्तीवर उमटला. निसर्ग, प्रेम, विरह, दुःख आणि एकाकीपण हे त्यांच्या कवितेचे पंचप्राण आहेत, असं म्हटलं गेलंय. एकलेपणाच्या आगीत तावून सुलाखून निघालेली, भावव्याकूळ करणारी असूनही त्यांच्या कवितेत सर्वस्पर्शी होण्याची ताकद आहे. एकटेपणाचे सारे ताण त्याच्या कवितेने तोलून धरले आहेत.
हवा फुलांचा शेजार, बाई, हासत राहावे
काळजाच्या कुपीमध्य। हवाबंद दुःख व्हावे
बाईंच्या कवितेतील प्रतिमा अगदी अनोख्या आहेत. त्यामुळे निसर्गसंवेदन फार निराळेपणे त्यात दिसतं.
उदा-
किती लुटावे डोळ्यांनी
दिवसाचे निळेपण
काच रंगेना मनाची
उमटेना निळी धून
त्यांची ‘कुब्जा’, ‘मृण्मयी’, ‘ऐक जरा ना’, ‘पत्र लिही पण’, ‘सुरंगा’ या अगदी अविस्मरणीय कविता. इंदिराबाईंच्या कवितेत स्त्राrचं भावविश्व काठोकाठ भरून आहे. तिच्या हर्ष-विमर्षाचे, तिच्या खोल वेदनांचे नाते त्यांच्या कवितेशी आहे.
त्यांची वृत्ती अत्यंत आत्मनिष्ठ. म्हणूनच ‘मृद्गंध’मधले ललित लेख अगदी जमून आले आहेत. त्यामानाने त्यांच्या कथा फारशा परिणामकारक नाहीत. त्यामागे कदाचित कथांची निर्मिती थोडी व्यावहारिक रेट्यामुळे झाली, हेही कारण असू शकते.
माधव आचवल यांनी म्हटल्याप्रमाणे, “काळाची अशी जाणीव पूर्वी कधी झाली नव्हती. अवकाश इतक्या निकटतेने कधी जवळ आले नव्हते आणि या दोन अनादि-अनंत परिमाणांच्या कैचीत सापडलेल्या जिवाचे असे एकाकीपण पूर्वी कोठे बघितले नव्हते. वेदनेला अशी वाचा कधी मिळाली नव्हती. केवळ अस्तित्त्वाचा असा भयंकर थकवा कधी आढळला नव्हता आणि या साऱयांनाच पोटात घेऊन पसरलेला असा भयाण काळोख पूर्वी कधी पहिला नव्हता. इंदिराबाईंच्या कवितेने हे सारे दिले.’’
खरोखर…एकुटपणावर हलकी फुंकर आहे बाईंची कविता!
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)





























































