ठाण्यात विजेत्या गोविंदा मंडळांचा संजय राऊत यांच्या हस्ते गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवसेनेच्या निष्ठेच्या महादहीहंडी उत्सवास भेट दिली. “हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे लाडके ठाणे आहे. या ठाण्यात हे गोविंदांच्या एकीचे विलोभनीय दृश्य अभिमान वाटावे असेच आहे. ज्या जिद्दीने आणि उत्साहाने तुम्ही एकत्र आला आहात, आपल्यालाही असेच मानवी थर रचत थेट विधानसभेपर्यंत मजल मारायची आहे,” असे खासदार राऊत यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. या वेळी खासदार राऊत यांच्या हस्ते ‘शिवतेज’ या महिला गोविंदांच्या पथकाला महापारितोषिकाने गौरविण्यात आले. या प्रसंगी शिवसेना नेते राजन विचारे, आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, नगरसेवक शहाजी खुस्पे, ओवळा-माजीवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, शहरप्रमुख अनिश गाढवे आदी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. १० तर्फे आयोजित बोरिवली पश्चिम सोडावाला लेन उत्सवाची दहीहंडी बाणडोंगरी पथकाने फोडली. या उत्सवाचे आयोजन शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे, कार्यालयप्रमुख देवेंद्र आंबेकर यांनी केले होते. या वेळी विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, शुभदा शिंदे, अशोक म्हामुणकर, सूर्यकांत निर्मळ उपस्थित होते.

अनेक आयोजकांनी उत्सवाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेतली होती. शेवटच्या थरावरील बालगोविंदांच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट लावण्यात आले होते. त्यामुळे बालगोविंदा जखमी होण्याचे प्रमाण कमी झाले.

एलआयसी स्थानिय लोकाधिकार समिती व शिवसेना शाखा क्र. १९९ च्या वतीने आयोजित दहीहंडीत माजी महापौर महादेव देवळे यांनी सलामी दिली.

जोगेश्वरी पूर्व मेघवाडी येथील हिंदमाता गोविंदा पथकाने मुंबई आणि ठाण्यात आठ थरांचे मानवी मनोरे रचत सलामी दिली.