
वारस हस्तांतरण किंवा सदनिका हस्तांतरणासाठी अर्ज, घरभाडे मिळत नसल्याच्या तक्रारी अशा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी (एसआरए) संबंधित विविध कामांसाठी आता सर्वसामान्य झोपडीधारकांना वारंवार अधिकाऱ्यांच्या दालनात चकरा मारण्याची गरज भासणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी एसआरएच्या वांद्रे (पूर्व) येथील मुख्यालयात चार किऑस्क मशिन्स बसवण्यात आल्या असून, त्याद्वारे २२ प्रकारच्या सेवा झटपट मिळणार आहेत.
दिवसाला शेकडो झोपडीधारक आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी एसआरए मुख्यालयात येतात. मात्र आपली तक्रार कुठे आणि कशी नोंदवावी, घराच्या हस्तांतरणासाठी अर्ज कुठे करावा याबाबत पुरेशी माहिती नसते. त्यामुळे एसआरएने २२ प्रकारच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु ज्यांना ऑनलाइन सेवेचा लाभ घेण्यात अडचणी येतात, अशा झोपडीधारकांसाठी आता मुख्यालयात चार किऑस्क मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. यांपैकी दोन मशिन्स ‘मैत्री’ कक्षात, तर दोन मशिन्स इतर ठिकाणी आहेत. त्यावर नागरिकांना मोबाइल क्रमांक नोंदवून तक्रारी किंवा अर्ज करता येणार आहेत. प्रत्येक नागरिकाला किऑस्क मशिनचा वापर करणे शक्य होईलच असे नाही, त्यामुळे अशा झोपडीधारकांसाठी मदतनीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.



























































