शासकीय अनुदानातील 3.65 लाखांचा अपहार; राहुरीतील महिला तलाठी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदत व सानुग्रह अनुदानाच्या वाटपात नियमबाह्य पद्धतीने कामकाज करून तीन लाख 65 हजार रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील महिला कामगार तलाठी मंगल रूपचंद गुसिंगे हिला राहुरी पोलिसांनी आज अटक केली. गेल्या सहा महिन्यांपासून ती फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, तसेच तत्कालीन तहसीलदारांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केल्यानंतर मंडल अधिकारी विजय बबनराव बेरड यांच्या फिर्यादीवरून एप्रिल 2026मध्ये राहुरी ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मंगल गुसिंगे ही राहुरीतील माहेगाव येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असताना शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाशी संबंधित अनुदानवाटपात अनियमितता झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

या तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. चौकशी अहवालानुसार, सन 2022 ते 2023 या कालावधीत गुसिंगे यांनी नियमबाह्य पद्धतीने एकूण तीन लाख 65 हजार 340 रुपयांचे अनुदान वितरित केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुसिंगे सहा महिन्यांपासून फरार होती. अखेर राहुरी पोलिसांच्या पथकाने तिला आज अटक केली.

पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस नाईक गणेश लिपणे यांचे पथक तपास करत आहेत.

जालना जिल्ह्यातही 13 लाखांचा अपहार

मंगल गुसिंगे हिने जालना जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून 12 लाख 24 हजार 802 रुपयांचा अपहार केल्याचीही माहिती पोलीस तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.