
>> नवनाथ शिंदे
सांस्कृतिक राजधानी म्हणून बिरुदे मिरवणाऱ्या शहरात उत्सवादरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण कळीचा मुद्दा बनला आहे. त्यावर मागील काही दिवसांपासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. एकीकडे गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच, डीजेचा वाद उफाळून आला आहे. गणेश मंडळे, राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना, सर्वसामान्य नागरिकांमध्ये अजूनही एकमत झाले नाही. त्यातूनच ध्वनिप्रदूषणासह डीजेवादन बंदीसाठी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. दहीहंडी अन् गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाबाबतीत बदलाचे वारे तयार झाले आहे.
सण-उत्सवात ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पुणेकर नागरिक सरसावले असून, यंदा महापालिकेत झालेल्या बैठकीपासून डीजेवादनविरोधी वातावरण तयार झाले आहे. त्यातच ध्वनिवादनाविरुद्ध प्रखर भूमिका घेऊन तर्कशुद्धीने मुद्द्यांची मांडणी करणारे विद्यानंद बापट हे तुफान चर्चेत आले आहेत. त्यांच्या वैचारिक मांडणीमुळे डीजेवादन व्यावसायिक पूर्णतः हतबल झाले आहेत. त्यातच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी डीजेच्या चारबेस, चार टॉप वादनाला परवानगी दिली आहे. मात्र, त्यातही नियमबाह्य पद्धतीने डेसिबलचे उल्लंघन झाल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवल्याचे सांगितले आहे.
डीजेवादनामुळे अनेकांच्या दिवास्वप्नांवर विरजण पडले आहे. एकीकडे सामाजिक संघटना, दुसरीकडे ध्वनिप्रदूषणाला विरोध करत स्पष्ट भूमिका घेणारे विद्यानंद बापट, तिसरीकडे डीजेच्या टॉप-बेसचे उल्लंघन करीत कर्णकर्कश आवाज काढणाऱ्यांना धडा शिकवण्याचा पुणे पोलिसांनी घेतलेल्या निर्णयामुळे बहुतांश मंडळे कात्रीत सापडली आहेत. त्यानंतरही डीजेचा आवाज वाढल्यास मात्र उत्सवासाठी महापालिका, पोलीस, मंडळांकडून सातत्याने घेण्यात येणाऱ्या बैठकांना काहीही अर्थ उरणार नाही. प्रत्येक नागरिकासह मंडळ कार्यकर्त्यांनी सामाजिक भान बाळगून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
डीजे टॉप म्हणजे काय?
साऊंड सिस्टीममधून आवाज स्पष्ट ऐकवणारा स्पीकर म्हणजे टॉप होय. गायकाचा आवाज, गाण्याचे शब्द, भाषण आणि वाद्यांमधील बारीक आवाज टॉपमधून ऐकू येतात. टॉपमध्ये मध्यम आणि तीव्र आवाज तयार होतो.
डीजे बेस काय आहे?
साऊंड सिस्टीममधून येणारा जड आणि घडघडणारा आवाज म्हणजे बेस होय. ढोल, ताशा किंवा गाण्यातील खालच्या पट्टीचा आवाज बेसमधून येतो. मोठा बेस स्पीकर जास्त हवा हलवतो, त्यामुळे आवाजासोबत कंपनेही जाणवतात. साऊंड सिस्टीममध्ये बेसचा वापर प्रामुख्याने जड आवाजासाठी केला जातो.
उच्च क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरले; अध्यक्षांसह तिघांना शिक्षा
ईद-ए-मिलादनिमित्त मिरवणुकीत उच्च क्षमतेची ध्वनिक्षेपक वापरून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी लोहियानगरमधील मंडळाच्या अध्यक्षांसह उपाध्यक्ष, ध्वनिक्षेपक यंत्रणा पुरविणाऱ्या व्यावसायिकाला न्यायालयाने शिक्षा सुनावली. अल मदिना यंग बॉईज यंग सर्कलचे अध्यक्ष वाहिद कासीम मणियार, उपाध्यक्ष जावेद मजीद शेख (दोघे रा. लोहियानगर, घोरपडे पेठ), ध्वनिक्षेपक यंत्रणा पुरविणारा प्रकाश कृष्णात अस्वले (रा. सावर्डे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांना शिक्षा सुनावली आहे. २६ ऑगस्टला त्यांनी नियमांचे उल्लंघन केले होते. संबंधितांविरुद्ध २४ तासांच्या आत आरोपपत्र दाखल केले होते. व्यावसायिकाची ध्वनी यंत्रणाही ३ महिने पोलिसांनी ताब्यात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्याचा आगामी काळात होणारा अपेक्षित धंदाही ठप्प झाला आहे.





























































