
नवी दिल्लीकडे जाणाऱ्या सिक्कीम महानंदा एक्स्प्रेसचे दोन डबे रविवारी पहाटे बिहारमधील आरा रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरले. पूर्व मध्य रेल्वेच्या दानापूर विभागांतर्गत रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही. गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सरस्वती चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात चालकाकडून रेड सिग्नलकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चुकीच्या सिग्नलवर गाडी पुढे गेल्याचे लक्षात येताच मोटारमनने रेल्वे मागे लूप लाईनकडे घेण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात गाडीच्या डब्यांची चाके रुळावरून खाली घसरली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ मदत आणि बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले.
या दुर्घटनेमुळे काही काळ या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र युद्धपातळीवर काम करून प्रभावित झालेला रेल्वे मार्ग मोकळा करण्यात आला. दुरुस्तीची सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सकाळी ७ वाजून २३ मिनिटांनी महानंदा एक्स्प्रेस तिच्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. या अपघाताचे नेमके कारण आणि परिस्थिती शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सविस्तर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून, दानापूर विभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

























































