
देशाचा जीडीपी 7.8 टक्के झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विशेष म्हणजे हा दावा केला जात असताना दुसरीकडे देशवासीयांना परदेशात जाऊ नका आणि सोनं खरेदी करू नका, असे सांगण्यात येत आहे. जर अर्थव्यवस्था खरंच मजबूत असेल तर ही परिस्थिती का? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील मुख्य मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच जनतेला धर्माची गुंगी दिली जात आहे, असा आरोपही यावेळी राज ठाकरे यांनी केला.
देशाचा जीडीपी वाढल्याचा दावा केला जात असला तरी देशातील 503 परदेशी कंपन्यांनी कामकाज बंद केले आहे. 2018-19 पासून 13 हजार उद्योगपती देश सोडून गेले आहेत. जर अर्थव्यवस्था सुधारत असेल, तर हे उद्योगपती देश का सोडत आहेत? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत दुसरं कोणीही बसू शकत नाही. पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयांत लावावा, पण तो दुसऱ्या भिंतीवर असायला हवा, असे स्पष्ट मतही यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच आपण धर्माभिमानी असलं पाहिजे, धर्मांध नाही. बेरोजगारी, महागाई आणि ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेवरून लक्ष हटवण्यासाठी लोकांना धर्मांध केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
कल्याण ग्रामीण मतदारसंघ व बोगस मतदार
2024 च्या निवडणुकीवेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघात जे नवीन मतदार जोडले गेले होते, त्यातील 95 टक्के मतदार ‘एसआयआर’च्या माध्यमातून काढून टाकण्यात आले आहेत. याचा अर्थ सत्ताधारी खोट्या मतदारांच्या जोरावर निवडून आले का, असा सवाल करत राज ठाकरे यांनी एसआरआरच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले.
गणेशोत्सवात दंगली घडवण्याची भीती
येत्या गणेशोत्सवात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा संशय व्यक्त करत सुजाण हिंदू आणि मुस्लिम नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आपले सण-उत्सव पारंपरिक पद्धतीनेच साजरे झाले पाहिजेत. नागपुरात डीजेवर बंदी घातली जाऊ शकते, तर संपूर्ण महाराष्ट्रात ती का लागू होत नाही? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.




























































