
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) व विविध शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो परीक्षार्थींच्या न्याय्य मागण्यांसाठी दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी अलका टॉकीज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांततापूर्ण मोर्चा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला पोलिसांनी अधिकृत परवानगी दिली असून यात हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून, केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थी शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करत असून यामागचे कारण केवळ एखादी परीक्षा किंवा भरती नसून संपूर्ण सरकारी व्यवस्थेवरून त्यांचा उडालेला विश्वास हे आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे आजचा तरुण त्रस्त झाला असून पेपर लीक, रखडलेल्या भरती प्रक्रिया, शिक्षणाचा वाढता खर्च, हॉस्टेलमधील अमानवीय परिस्थिती आणि डीबीटीमधील गैरव्यवहार यांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र में हजारों छात्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं – इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भर्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा है।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा की असहनीय लागत, हॉस्टल…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 6, 2026
एमपीएससी सारख्या घटनात्मक संस्थेवर ताबा मिळवून तिची विश्वासार्हता पूर्णपणे नष्ट केली जात असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्येक मागणी पूर्णपणे रास्त आहे. सरकारने या आंदोलकांचा आवाज ऐकून त्वरित कठोर आणि ठोस कारवाई करावी, अन्यथा न्याय मिळेपर्यंत विद्यार्थ्यांचा हा आक्रोश असाच वाढत राहील, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.


























































