मध्य प्रदेशमध्ये विषारी दारूमुळे 9 जणांचा तडफडून मृत्यू, अनेक गंभीर; सागर जिल्ह्यात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बांदा तहसील अंतर्गत येणाऱ्या एका गावात दुर्दैवी घटना घली आहे. बनावट आणि विषारी दारूचे सेवन केल्यामुळे तब्बल 9 जणांचा तडफडून मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर आजारी पडले आहेत. शनिवार आणि रविवार दरम्यानच्या रात्री ही घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

बांदा तहसीलच्या बराज गावातील काही ग्रामस्थांनी रात्री एकत्र येऊन दारूचे सेवन केले होते. दारू प्यायल्यानंतर काही वेळातच अनेकांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. उलट्या, चक्कर येणे, अंधारी येणे असा त्रास सुरू झाल्याने पीडितांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उपचारापूर्वीच काही जणांचा मृत्यू झाला, तर काहींचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. एकामागोमाग 9 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सागरचे पोलीस अधीक्षक अनुराग सुजानिया यांच्यासह पोलीस पथक तातडीने बराज गावात दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. बनावट दारूचा हा साठा कुठून आला, ती कोणी बनवली होती आणि गावात ती कशी पोहोचली, या मुख्य मुद्द्यांवर पोलीस सध्या लक्ष केंद्रित करत असून संशयितांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, सागरच्या जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांनी या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत आरोग्य यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवले आहे. आजारी असलेल्या नागरिकांवर सध्या स्थानिक नागरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांचे एक विशेष पथक आसपासच्या दोन गावांमध्ये पाठवण्यात आले असून, तिथे घरोघरी जाऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष आवाहन केले आहे की, गेल्या 24 ते 48 तासांत ज्या कोणी कोणत्याही प्रकारच्या दारूचे सेवन केले असेल किंवा ज्यांना विषबाधेची कसलीही लक्षणे जाणवत असतील, त्यांनी कोणतीही भीती न बाळगता तातडीने रुग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी. सध्या या संपूर्ण प्रकरणावर पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग बारीक लक्ष ठेवून असून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने केली जात आहे.